मुंबई ( Drugs and Gutkha Menace Among Youth) : राज्यात बंदी असलेला गुटखा, फ्लेवर्ड तंबाखू आणि घातक अंमली पदार्थांची मुंबईसह उपनगरांतील शाळा आणि महाविद्यालयीन परिसराजवळ छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत असल्याचे दिसत आहे. या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत चालली आहे. याची दखल घेत मुंबईतील विविध महिला आणि सामाजिक संघटनांनी आता प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासनाने शैक्षणिक संस्थांच्या बाहेरील या माफियांवर तात्काळ कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला संघटनांनी दिला आहे.
संघटनाच्या मते नियमानुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटरच्या परिघात तंबाखू किंवा अंमली पदार्थांची विक्री करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, छुप्या षडयंत्राद्वारे हे पदार्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात असण्याचा संशय आहे. तर फॅशन किंवा कुतूहल म्हणून मुले या व्यसनाकडे आकर्षित होतात आणि नंतर त्याचे गुलाम बनतात, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या परिसरात गुटखा, सिगारेट आणि ऊर्जा पेयांच्या विक्रीवर निर्बंध लादण्याचे नवे आदेश दिले आहेत मात्र या आदेशाची अंमलबजावणी तीव्रतेने व्हायल हवी. ( Drugs and Gutkha Menace Among Youth)
शाळांच्या परिसरात ’मोका’ लावण्याची मागण
महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे की, "हा केवळ गुटखा विक्रीचा सादा गुन्हा नाही, तर एका मोठ्या रॅकेटचा भाग आहे जे जाणीवपूर्वक शाळकरी मुलांना टार्गेट करत आहे." गुटखा आणि अंमली पदार्थांचे जाळे पसरवणार्या मोठ्या तस्करांच्या आणि माफियांच्या टोळ्यांवर राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ’मोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. ( Drugs and Gutkha Menace Among Youth)
पोलिसांची कारवाई
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा विकणार्यांवर आतापर्यंत हजारो गुन्हे दाखल करण्यात आले असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि सांगली या भागांत विशेष मोहिमे अंतर्गत हजारो टपर्यांची तपासणी करण्यात आली आहे. ( Drugs and Gutkha Menace Among Youth)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.