दृष्टीहीन गोविंदा पुन्हा विक्रम करण्यासाठी सज्ज! पाच थरांचा मानवी मनोरा रचण्याचा सराव

    28-Aug-2026   

 Blind Govinda Dahi Handi Team
 
मुंबई (Blind Govinda Dahi Handi Team) : जन्माष्टमीच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे यंदाही नयन फाउंडेशन फर्स्टचे ६० सदस्यांचे दृष्टिहीन गोविंदा पथक एका नव्या विक्रमासाठी आणि सुरक्षेच्या पूर्ण तयारीसह मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. गेल्या काही वर्षांत चार थरांचे मानवी मनोरे यशस्वीरीत्या रचणाऱ्या या पथकाने २०१९ आणि २०२५ मध्ये पाच थरांचा मानवी मनोरा रचून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाही हाच पराक्रम पुन्हा गाजवण्यासाठी पथकाचा कसून सराव सुरू आहे.
 
नयन फाउंडेशनचे अध्यक्ष आणि या दृष्टिहीन गोविंदा पथकाचे संस्थापक देवेंद्र पोनालगर यांनी सांगितले की, पथकातील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहे. २०१३ पूर्वी ते स्वतः इतर पथकांसोबत दहीहंडीत सहभागी होत असत. दृष्टिहीन बांधवांची दहीहंडीत सहभागी होण्याची तीव्र इच्छा पाहून २०१३ मध्ये कांदिवली येथील एका कार्यक्रमातून या पथकाची पायाभरणी झाली. २०१४ पासून हे पथक अधिकृतपणे विविध दहीहंडी उत्सवांमध्ये सहभागी होत आहे. सध्या या पथकात ४० पुरुष आणि २० महिला सदस्यांचा समावेश आहे. यात कार्यालयीन कर्मचारी, कामगार आणि विक्रेते अशा विविध क्षेत्रांतील व्यक्ती काम करतात. (Blind Govinda Dahi Handi Team)
 
दृष्टीहीन गोविंदांच्या हालचाली आणि समन्वयासाठी प्रशिक्षक एका विशेष ऑडिओ पद्धतीचा वापर करतात. मनोरा उभारताना प्रत्येक थर पूर्ण झाल्यावर पुढील थरासाठी शिट्टीद्वारे सूचना दिली जाते. गोविंदांचे लक्ष विचलित होऊ नये आणि दुखापत टळावी, म्हणून मनोरा उभारताना आयोजकांना सर्व माईक आणि ऑडिओ सिस्टीम बंद ठेवण्याची विनंती केली जाते. मनोरा पूर्ण झाल्यानंतर तो अत्यंत शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने खाली उतरवला जातो.
 
दरवर्षी दहीहंडीच्या दिवशी हे पथक वरळी, घाटकोपर, विक्रोळी आणि ठाणे परिसरातील सुमारे १० ते १२ दहीहंडी उत्सवांना भेटी देते. पथकातील सर्व सदस्य पूर्णवेळ नोकरी करत असल्याने, त्यांच्या सोयीनुसार शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी विशेष सरावाचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी पथकाच्या सर्व गरजा आणि सुविधा पूर्ण करण्यासाठी खोका फाउंडेशन आणि अद्विका उन्नती फाउंडेशन या दोन संस्थांनी मोलाचा मदतीचा हात पुढे केला आहे. सर्व अडचणींवर मात करत पाच थरांचा मनोरा रचून पुन्हा एकदा नवा इतिहास घडवण्यासाठी हे दृष्टिहीन गोविंदा पूर्ण उत्साहाने सज्ज झाले आहेत. (Blind Govinda Dahi Handi Team)
 
सुरक्षेची पूर्ण काळजी आणि स्वयंसेवकांचे कवच
 
दुखापती टाळण्यासाठी पथकाने विशेष नियम तयार केले आहेत. जर सर्वात वरचा थर अस्थिर झाला किंवा एखादी व्यक्ती खाली पडली, तरी खालच्या थरातील सदस्यांनी मनोरा तोडू नये, अशी शिस्त पाळली जाते. कोणतीही व्यक्ती पडल्यास तिला तत्काळ झेलण्यासाठी प्रशिक्षित आणि सतर्क स्वयंसेवक सदैव तैनात असतात. सुरक्षेचा उपाय म्हणून पथकाने सर्व सदस्यांसाठी ₹१० लाखांची विमा पॉलिसीदेखील काढली आहे. (Blind Govinda Dahi Handi Team)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर