गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त राखणे ही सामूहिक जबाबदारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ganeshotsav 2026
 
मुंबई : (Ganeshotsav 2026) महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सव उत्साहात, शिस्तीत आणि सुरक्षित वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासन, गणेशोत्सव मंडळे आणि समन्वय समित्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव-2026 निमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध सूचना दिल्या. भाविकांना शुद्ध व भेसळमुक्त प्रसाद मिळावा यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती घेऊन आवश्यक किमान निकषांचे पालन करावे. मंडळांनी यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण घ्यावे, असेही त्यांनी सांगितले. (Ganeshotsav 2026)
 
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाला दिलेले व्यापक स्वरूप कौतुकास्पद आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेला सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा विचार पुढे नेणे गरजेचे आहे. राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेल्या गणेशोत्सवाची परंपरा, शिस्त आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रशासनासह मंडळे आणि नागरिकांची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. (Ganeshotsav 2026)
 
गणेशोत्सव मंडळांच्या परवानग्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवू नयेत. जुन्या मंडळांच्या बहुतांश परवानग्या नियमित स्वरूपाच्या असल्याने प्रशासनाने सक्रिय पुढाकार घेऊन त्या जलदगतीने द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. गणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत ठेवून खड्डे राहणार नाहीत तसेच रात्री पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध असेल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. (Ganeshotsav 2026)
 
फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष ठेवून कठोर कारवाई करावी. मोठ्या गणेशमूर्तींच्या मिरवणुकांदरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांची पुन्हा पडताळणी करून आवश्यक त्या सर्व व्यवस्था सुनिश्चित कराव्यात. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. (Ganeshotsav 2026)
 
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम 143 नुसार ट्रस्टच्या नावावर असलेल्या कार्यालयांना मालमत्ता करमाफीची तरतूद आहे. यासाठी संबंधित मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. (Ganeshotsav 2026)
 
गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाने मागील वर्षीचा निर्णय कायम ठेवल्याने मंडळांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. पीओपीच्या मूर्ती समुद्रात किंवा नदीपात्रात विसर्जित होऊन प्रदूषण होणार नाही, यासाठी योग्य प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती शासनाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (Ganeshotsav 2026)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर