अमरावती रुग्णालयातील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून दखल

Amravati Hospital Fire
 
मुंबई : (Amravati Hospital Fire) अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयातील सिक न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये (SNCU) दि. २४ ऑगस्ट रोजी लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू, तर चार बालके जखमी झाल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वयंस्फूर्त दखल घेतली आहे. या घटनेमुळे नवजात बालकांच्या सुरक्षिततेसह रुग्णालयातील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ही बाब सत्य असल्यास मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे नमूद केले आहे. आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Amravati Hospital Fire)
 
जखमी बालकांच्या प्रकृतीचा अहवाल अपेक्षित
 
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मागविलेल्या अहवालात जखमी झालेल्या चारही नवजात बालकांच्या सध्याच्या आरोग्यस्थितीचा तपशील देण्यास सांगितले आहे. तसेच दुर्घटनेनंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे वाटप संबंधित कुटुंबांना करण्यात आले आहे की नाही, याची माहितीही अहवालात अपेक्षित आहे.(Amravati Hospital Fire)
 
रुग्णालयातील नवजात बालकांसाठी च्या अतिदक्षता विभागात सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय उपकरणांची देखभाल आणि आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी असलेल्या यंत्रणेची कार्यक्षमता याबाबतही या घटनेनंतर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोष निश्चित करण्याची तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यात लक्ष घातल्याने अमरावतीतील या दुर्घटनेच्या तपासाला आता अधिक गांभीर्य प्राप्त झाले असून, राज्य सरकारच्या अहवालानंतर आयोगाकडून पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. (Amravati Hospital Fire)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर