काठमांडू (Nepal Flood Indian Citizens Missing) : नेपाळ-तिबेट सीमाभागात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. या दुर्घटनेत सुमारे १०५ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे.
भारतातही सतर्कतेचा इशारा
नेपाळमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत-नेपाळ सीमेलगतच्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता बिहारमध्ये प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. (Nepal Flood Indian Citizens Missing)
बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी तातडीची बैठक घेऊन सीमेलगतच्या जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF आणि SDRFची पथके तैनात करण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही दक्षता
बिहारसोबतच उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील जिल्ह्यांमध्येही पुराचा धोका जाणवू लागला आहे. महाराजगंज, गोरखपूर, सिद्धार्थनगर आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये रोहिणी, गंडक तसेच इतर उपनद्यांच्या पाणीपातळीवर प्रशासनाद्वारे सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. (Nepal Flood Indian Citizens Missing)
उत्तर प्रदेश प्रशासनाने नेपाळ सीमेलगतच्या सखल भागांमध्ये दक्षता वाढवली असून, नागरिकांना नदी आणि जलप्रवाहांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगींचे नागरिकांना आश्वासन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत नेपाळच्या रसुवा भागातील भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी प्रशासनाला आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. (Nepal Flood Indian Citizens Missing)
गंडक आणि नारायणी नद्यांची वाढती पाणीपातळी तसेच महाराजगंज आणि कुशीनगरमधील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाला पूर्ण दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, नेपाळमधील बचावकार्य आणि बेपत्ता भारतीय नागरिकांचा शोध याकडे भारत आणि नेपाळच्या प्रशासनाचे लक्ष लागले आहे. (Nepal Flood Indian Citizens Missing)