नाशिकमध्ये दि. २४ ऑगस्ट ते दि. २ सप्टेंबरदरम्यान काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर होत आहे. दि. २ सप्टेंबर रोजी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या शिबिराला उपस्थित राहून पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जाते. संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसने हा उपक्रम हाती घेतला असला, तरी नाशिकच्या राजकीय भूमीवर काँग्रेसची झालेली पीछेहाट पाहता, या शिबिरातून नेमके काय साध्य होणार, हे बघणेच मुळी औत्सुक्याचे ठरणार आहे.
कधीकाळी नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे मजबूत संघटन होते. गावागावांत कार्यकर्त्यांचे जाळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव आणि जनतेशी असलेला थेट संपर्क ही काँग्रेसची ताकद होती. मात्र, गेल्या काही वर्षांत पक्षाची ही ताकद कमालीची खालावली. आता तर पक्षाकडे सक्रिय कार्यकर्त्यांची कमतरता तर आहेच; पण स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचा अभाव आणि सततच्या अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसची संघटनात्मक पकड ढिली झाली आहे. अशा परिस्थितीत दिल्लीतील नेतृत्वाने नाशिकमध्ये येऊन कार्यकर्त्यांमध्ये ‘जान’ फुंकण्यासाठी उठाबशा काढणे मोठे रंजक ठरणार आहे. पण, केवळ शिबिरे, भाषणे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून संघटन पुन्हा उभे राहणार आहे का, हा खरा सवाल आहे. काँग्रेससमोर सर्वांत मोठे आव्हान आहे, ते कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे. नेतृत्वाने निवडणुकीपुरते नव्हे, तर वर्षभर जनतेमध्ये राहून काम करणारी यंत्रणा उभी करणे गरजेचे असताना, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्ते आणि नेतेदेखील गायब होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले. त्यामुळे सामान्यांमध्ये काँग्रेसची प्रतिमा पुरती मलिन झाली आहे. कारण, केवळ कागदावर जिल्हाध्यक्षांची संख्या वाढवणे आणि प्रत्यक्षात बूथपर्यंत संघटन पोहोचवणे यात मोठा फरक आहे. भाजपने बूथस्तरापासून संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याने त्याचा राजकीय फायदा पक्षाला मिळताना दिसतो. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हे सर्व साध्य करेल की, पुन्हा तोंडावर आपटेल हे येणार्या काळात निश्चित स्पष्ट होईल. त्यामुळेच सध्या काँग्रेसला शिबिरांची नाही, तर आत्मपरीक्षण करून आधी नेत्यांनी सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळण्याची गरज आहे.
पृथ्वीराजबाबांचा एकपात्री प्रयोग!
एकीकडे काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्व असलेले राहुल गांधी देश-विदेशात आपल्या वाणीने हसू करून घेत असताना, दुसरीकडे कधीकाळी राहुल यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्या छत्रछायेखाली वावरलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील संधी मिळेल तेव्हा वायफळ बडबड करून राज्याच्या राजकारणात धमाल उडवून देत, आपण किती विद्वान आहोत, हे भासवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांनी, "एपस्टीन फाईल’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असून, लवकरच ते पंतप्रधानपदावरून दूर होतील,” असे विधान करून जनतेला एकपात्री प्रयोग करून दाखवला. मात्र, त्याचे पुढे काय झाले, याचा दुसरा अंक ते लिहिण्यास विसरले. पण, काही काळ उलटत नाही; तोच कालपरवा नाशिकमध्ये आले असता, त्याचा दुसरा अंक मात्र त्यांनी सिंहस्थाच्या नावाने सादर केला. काय तर म्हणे, नाशिकच्या कुंभमेळा कामांमध्ये ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमिशन लाटले जात असून, नाशिकची प्रचंड लूट केली जात असल्याने त्याबाबत नाशिककर करदात्यांनी सत्ताधार्यांना जनआंदोलनाद्वारे जाब विचारावा, असे आवाहन पृथ्वीराजबाबांनी केले.
हे आवाहन त्यांनी करदात्यांना केले हे एका अर्थाने बरेच झाले. त्यातून नाशिकमध्ये काँग्रेसची किती पीछेहाट झाली आहे, हे वास्तव एकप्रकारे समोर आले. त्यांना माहीत आहे की, राज्यपातळीवरचा कोणताही नेता नाशिकमध्ये आला, तर त्याच्या साध्या स्वागतालाही उपस्थित राहण्याचे कष्ट पदाधिकारी घेत नाहीत. जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जनआंदोलन उभे करण्याचे आवाहन करण्याचा प्रकार केला, तर नळावरील भांडणाला जास्त गर्दी जमेल; पण काँग्रेसच्या आंदोलनाला नाही, इतकी चिरनिद्रेत गेलेल्या काँग्रेसची अवस्था आहे. आपलेच घोडे पुढे दामटवणार्या चव्हाण यांनी कर्नाटकात अशाच प्रकारे कमिशन लाटले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर तेथील जनतेने सत्ताधारी भाजपला खाली खेचल्याचे उदाहरण दिले. त्यामुळे २०२९ मध्येदेखील भाजपची सत्ता राहणार नसल्याची भविष्यवाणी लगोलग करून टाकली. पण, आपण मुख्यमंत्री असताना आपल्यासमोर आलेल्या किती फायली हातावेगळ्या केल्या, याचाही हिशोब त्यांनी मांडावा, केवळ शिळ्या कढीला ऊत आणू नये!