नाशिक (Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी २५४ कोटी रुपयांचा आराखडा आणि सुमारे ३,५०० मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, ट्रॉमा केअर, औषधसाठा, रुग्णालयांतील खाटा आणि गर्दीच्या ठिकाणी वैद्यकीय पथकांची तैनाती यावर विशेष भर देण्यात येणार आहे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांचा आढावा घेत प्रलंबित रुग्णालयांची कामे मोहीम स्तरावर पूर्ण करून डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. नदीकाठ, साधुग्राम, वाहनतळ आणि गर्दीच्या प्रमुख ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत. नवीन रुग्णवाहिका व वैद्यकीय उपकरणांसह ट्रॉमा केअर सेंटर, जळीत रुग्णांसाठी अद्ययावत कक्ष, सिटी स्कॅन सुविधा आणि शीतकक्षाची क्षमता वाढविण्याचे नियोजन आहे.(Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan)
सिंहस्थाच्या तयारीत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे ‘पितळ’ उघडे
सिंहस्थासाठी मोठी तयारी सुरू असतानाच आरोग्यमंत्र्यांच्या पाहणीत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टरांची कमतरता, औषधसाठा, स्वच्छता, उपकरणे, रुग्णवाहिका आणि प्रशासकीय त्रुटी समोर आल्या. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सोनोग्राफी यंत्र आणि रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली. ३० खाटांच्या रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यानंतर अतिरिक्त २० खाटांच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले, दिंडोरीतील बरखेडा व तळेवाड येथील रुग्णाच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. स्वच्छता, औषधांची उपलब्धता, उपकरणांची कार्यक्षमता आणि रुग्णसेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा मंत्र्यांनी दिला. बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न मिळण्याच्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली.(Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan)
खासगी आरोग्य क्षेत्राचा सहभाग
सिंहस्थातील वाढता वैद्यकीय ताण कमी करण्यासाठी खासगी रुग्णालये, डॉक्टर संघटना आणि वैद्यकीय संस्थांचा समन्वय साधण्यात येणार आहे. रुग्णालय नोंदणी, विमा प्रक्रिया, जैववैद्यकीय कचरा आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसंदर्भातील अडचणी सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.(Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan)
जनआरोग्य गैरव्यवहारावर कठोर इशारा
दरम्यान, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील कथित गैरव्यवहाराच्या एसआयटी चौकशीचीही दखल घेण्यात आली. मृत व्यक्तींच्या नावाने निधी उचलल्याच्या तक्रारींसह आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून, तपासात दोषी आढळणारे अधिकारी, रुग्णालये, डॉक्टर अथवा अन्य कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला. एकीकडे सिंहस्थासाठी २५४ कोटींची आरोग्य तयारी, तर दुसरीकडे ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची कमतरता, असे चित्र आहे. त्यामुळे सिंहस्थासाठी होणारे आरोग्य बळकटीकरण कुंभमेळ्यानंतरही सामान्य नागरिकांच्या कायमस्वरूपी उपयोगी पडणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.(Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan)