‘2029 मध्ये महिलांना आरक्षण देणारच’; फडणवीसांचा चिदंबरम यांना पलटवार

Fadnavis-Chidambaram Dispute
 
मुंबई : (Fadnavis-Chidambaram Dispute) महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या भूमिकेवर टीका करताना, “2023 मध्ये ज्या विधेयकाला चिदंबरम यांच्यासह काँग्रेसने मतदान करून समर्थन दिले, त्याच विधेयकातील डीलिमिटेशनच्या तरतुदीला आता विरोध कसा काय?” असा सवाल फडणवीस यांनी केला.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
फडणवीस म्हणाले की, 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकात डीलिमिटेशन आणि त्यासाठी नवीन जनगणनेची आकडेवारी या दोन्ही बाबी स्पष्टपणे मान्य करण्यात आल्या होत्या. काँग्रेसने त्यावेळी मतदान करून या तरतुदींना मान्यता दिली होती. मात्र, कोविडमुळे जनगणना पुढे ढकलली गेल्याने 2029 मध्ये महिला आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने जुन्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे डीलिमिटेशन करण्याची तरतूद करणारी सुधारणा आणली. मात्र, काँग्रेसने त्याला विरोध केला, असा आरोप त्यांनी केला.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
“2023 मध्ये विधेयकाला समर्थन दिले कारण ते बहुमताने मंजूर होणार असल्याची त्यांना खात्री होती. मात्र, प्रत्यक्षात 2029 मध्ये महिलांना आरक्षण देण्याची संधी आली, तेव्हा काँग्रेसने विरोध केला. यावरून त्यांची महिला आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट होते,” असा घणाघात फडणवीस यांनी केला.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
चिदंबरम यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी “तुमच्या नेत्यांनी पुण्यात येऊन काहीही सांगितले तरी काँग्रेस महिला आरक्षणाच्या विरोधात आहे. तुम्हाला 2029 मध्ये महिलांना आरक्षण द्यायचे नाही,” असा आरोप केला. “माझा माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. काहीही झाले तरी 2029 मध्ये महिलांना आरक्षण देऊनच राहू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
मराठी शिकण्यासाठी रिक्षाचालकांना आणखी वेळ देण्याची तयारी
 
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा शिकण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावरही फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. हिंदी भाषिक रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठीचे तज्ज्ञ बनवण्याचा सरकारचा उद्देश नसून, कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असावी, एवढाच आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले. भाषेच्या आधारावर कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. ज्यांना आणखी वेळ हवा असेल, त्यांना वेळ वाढवून देण्यास सरकार तयार आहे,” असे फडणवीस म्हणाले.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
पानिपत येथे महाराष्ट्र-हरियाणा संयुक्त शौर्य स्मारक
 
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे भव्य स्मारक उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारची संयुक्त समिती स्थापन करून स्मारकाची उभारणी करण्यात येणार असून, स्मारकाच्या संकल्पनेत महाराष्ट्राकडून आवश्यक ते इनपुट देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा टप्पा वितरित
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. या टप्प्यात सुमारे 6 लाख 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ₹5,086 कोटी जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोन टप्प्यांत आतापर्यंत सुमारे 12 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, एकूण ₹11,115 कोटी वितरित झाल्याचे फडणवीस म्हणाले.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम पोहोचवली जाईल. त्यानंतर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ₹50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
पारंपरिक तेल व्यवसायावर अन्याय होऊ देणार नाही
 
सुटे तेल विक्रीवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक तेल व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी मंत्रिमंडळातील भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तेलाची गुणवत्ता आणि भेसळ रोखण्याबरोबरच पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करण्यासाठी FDA ला योग्य SOP तयार करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
उद्योग महाराष्ट्रातून जाणार नाहीत
 
सोलापूरमधील बीडी उद्योगातील काही कारखानदार तेलंगणात जाण्याची भूमिका घेत असल्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी, “महाराष्ट्रापेक्षा उत्तम राज्य नाही. कोणाच्याही तक्रारी असतील तर सरकार त्यावर मार्ग काढेल,” असे सांगितले. महाराष्ट्रातील उद्योग टिकवण्यासाठी सरकार सर्व संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
NICU आगप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी
 
दरम्यान, NICU मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर फडणवीस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. अशा ठिकाणी सातत्याने फायर ऑडिट केले जाते. तरीही आग कशी लागली, फायर ऑडिट प्रत्यक्ष झाले होते की केवळ कागदोपत्री दाखवण्यात आले होते, याची सखोल चौकशी केली जाईल. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.(Fadnavis-Chidambaram Dispute)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर