छत्रपती संभाजीनगर : (Khavdya Hill) नेहमीच्या किरकोळ कौटुंबिक वादाचे पर्यावसान एका सुखी कुटुंबाच्या संपूर्ण नाशात होईल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव शिवारात असलेल्या खवड्या डोंगरावर शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी मन सुन्न करणारी घटना घडली. आत्महत्या करण्यासाठी कड्यावर गेलेल्या आपल्या १९ वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आधी वडिलांचा तोल गेला, आणि त्यानंतर झालेल्या प्रचंड धक्क्यातून आईनेही दरीत झेप घेतली. अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेत एकाच चितेवर संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झाला.या भीषण अपघातात मुरलीधर दामोदर चांदगुडे (वय ४८), त्यांची पत्नी संगीता मुरलीधर चांदगुडे (वय ४२) आणि मुलगा कुणाल मुरलीधर चांदगुडे (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.
हे कुटुंब मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील असून सध्या शहरातील झाल्टा फाटा परिसरातील अक्षयबन सोसायटीत राहत होते. मृत कुणाल हा ’नीट’ परीक्षेची तयारी करत होता, तर त्याचे वडील मुरलीधर हे ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून कुणालच्या मोबाईलच्या थकलेल्या हप्त्यावरून आणि खर्चाच्या पैशांवरून घरात किरकोळ वाद सुरू होते. (Khavdya Hill)
काल सकाळी पुन्हा याच मुद्द्यावरून वाद झाल्याने कुणाल रागाच्या भरात घरून निघाला. मात्र, तो सरळ वाळूज जवळील धोकादायक खवड्या डोंगरावर गेला आणि दरीच्या टोकावर जाऊन उभा राहिला. कुणाल आत्महत्या करण्याच्या उद्देशाने डोंगरावर गेल्याची माहिती मिळताच त्याचे आई-वडील, नातेवाईक आणि वाळूज एमआयडीसी पोलीस तातडीने तिथे पोहोचले. आई संगीता आणि वडील मुरलीधर हे दोघेही "बाळा, खाली ये रे.. तुझ्या पाया पडतो" अशी हंबरडा फोडून विनवणी करत होते. उपस्थित पोलीस आणि गावकर्यांनी तब्बल तीन तास कुणालची मनधरणी करण्याचा आणि त्याचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला .दीर्घ काळ चाललेल्या या मनधरणीनंतर कुणाल हळूहळू शांत होत असल्याचे दिसत होते. हीच संधी साधून व्याकुळ झालेल्या वडील मुरलीधर यांनी पुढे धाव घेत कुणालला कड्यावरून मागे खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु, डोंगराच्या निसरड्या कड्यावर उभ्या असलेल्या कुणालला पकडताना दुर्दैवाने मुरलीधर यांचा पाय घसरला आणि तोल गेला. ते कुणालसह थेट शेकडो फूट खोल दरीत असलेल्या खडकांवर कोसळले. आपल्या डोळ्यांसमोर पती आणि पोटचा गोळा क्षणार्धात दरीत कोसळल्याचे पाहताच आई संगीता यांना तीव्र धक्का बसला. काहीही विचार न करता, तीव्र दुःखाच्या भरात त्यांनीही पती-मुलाच्या पाठीमागे थेट दरीत स्वतःला झोकून दिले. (Khavdya Hill)
परिसरात पसरली शोककळा
डोंगरावरून तिघेही खाली पडल्याचे पाहून उपस्थित पोलीस आणि जवानांनी तातडीने दरीत उतरून बचावकार्य राबवले. अत्यंत कष्टाने तिघांनाही बाहेर काढून शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिघांनाही मृत घोषित केले. अवघ्या १९ वर्षांच्या मुलाच्या एका क्षणाच्या रागाने हसते-खेळते कुटुंब संपवल्यामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहर आणि वाळूज परिसर सुन्न झाला असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Khavdya Hill)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.