जनसेवेचा अखंड वारकरी!

 Krishnaji Ganpat Bhagat krishnaji-ganpat-bhagat-sinnar-social-education-cultural-service Krishnaji Ganpat Bhagat has made a lasting contribution to Sinnar through education, social service, library development, cultural initiatives and public life over several decades. Krishnaji Ganpat Bhagat: A Lifelong Champion of Public Service in Sinnar Krishnaji Ganpat Bhagat, Sinnar, Social Service, Education, Sinnar Public Library, Maratha Vidya Prasarak Samaj, Sinnar Culture, Social Work, Maharashtra, Public Servi
 
 
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनावर आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणार्‍या कृष्णाजी गणपत भगत यांच्याविषयी...
 
सिन्नरच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनावर आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणार्‍या व्यक्तिमत्त्वांमध्ये कृष्णाजी गणपत भगत यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. शिक्षणाचा प्रसार, समाजसेवा, लोकसंपर्क, ग्रंथप्रेम आणि संस्कृतीसंवर्धन या विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान सिन्नरच्या विकासाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्व ठरले आहे.
 
गेली अनेक दशके कृष्णाजी गणपत भगत यांनी प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता, समाजकारण आणि लोकसेवेचा अखंड ध्यास घेतला. ऑगस्ट १९४९ मध्ये सिन्नर येथील सर्वसाधारण शेतकरी गणपत कोंडाजी भगत आणि नर्मदाबाई भगत यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. चार भाऊ आणि पाच बहिणींच्या मोठ्या कुटुंबात वाढताना कष्ट, प्रामाणिकपणा, माणुसकी आणि समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर झाले. दुष्काळ, आर्थिक संकटे आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत असतानाही त्यांच्या वडिलांनी १९४५ मध्ये गणेशपेठेत सायकलदुरुस्तीचे दुकान सुरू केले. बालपणापासूनच शिक्षणासोबत दुकानाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
 
वडिलांनी दिलेल्या ‘माणसे जोडा’ या जीवनमंत्रामुळे त्यांच्या लोकसंग्रहाचा विशाल परिवार निर्माण झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचा विवाह निफाडच्या चितेगाव येथील प्रगतशील शेतकरी नरहरी गाडे यांच्या कन्या शकुंतलाबाई यांच्याशी झाला. त्यांच्या सहकार्यामुळे संसारासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक कार्यालाही नवी ऊर्जा मिळाली. आजच्या काळातही एकत्र कुटुंबपद्धतीचे जिवंत उदाहरण म्हणून भगत कुटुंबाकडे पाहिले जाते. मुले, सुना, पुतणे, नातवंडे आणि संपूर्ण परिवार आजही त्यांच्या प्रेमळ छत्रछायेखाली गुण्यागोविंदाने नांदत आहे. कुटुंबातील जिव्हाळा, आपुलकी आणि एकोप्याची परंपरा हीच त्यांच्या आयुष्याची खरी संपत्ती आहे. कृष्णाजी भगत यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले ते ‘मराठा विद्या प्रसारक समाज’ या संस्थेमुळे! संस्थेचे ज्येष्ठ नेते तथा तत्कालीन आमदार सूर्यभान गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. मुसळगाव सहकारी औद्योगिक वसाहतीच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांची ‘मराठा विद्या प्रसारक समाज’ संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आणि समाजकार्यातील त्यांचा प्रवास अधिक व्यापक झाला.
 
सन १९८४ पासून ‘मविप्र’चे संचालक म्हणून त्यांनी सिन्नर तालुक्यातील शिक्षणाच्या विकासासाठी अविरत परिश्रम घेतले. त्याकाळात अनेक शाळा देवळात आणि खासगी जागांमध्ये भरत असत. त्यांनी गावोगावी लोकसंपर्क वाढवून शाळांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली. परिणामी, आज तालुक्यातील बहुतांश शाळांना स्वतःच्या प्रशस्त इमारती, संरक्षण भिंती आणि आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ‘मविप्र’ संस्थेत कार्यरत असताना त्यांना डॉ. वसंतराव पवार, अ‍ॅड. बाबुराव ठाकरे, अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे, डॉ. डी. एस. आहेर, एकनाथ जाधव, प्रतापदादा सोनवणे, मालोजी मोगल, अ‍ॅड. नामदेव गिते आणि डॉ. ना. का. गायकवाड यांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. सन १९९७ मध्ये ते सिन्नर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी मोठ्या मताधिक्याने निवडून आले. नगरसेवक म्हणून कार्य करताना सरस्वती नदीवरील पूल उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला. तसेच बारादरी येथील दशक्रिया विधी-स्थळाचे सुशोभीकरण करून त्या परिसराला नवे स्वरूप प्राप्त करून दिले. गेली २५ वर्षे ते वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वाचनालयाची इमारत, ग्रंथसंपदा, वाचकसंख्या आणि विविध उपक्रमांमध्ये लक्षणीय वाढ झाली. वाचनालयाला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’, ‘डॉ. राजाराम मोहन रॉय पुरस्कार’, तसेच महाराष्ट्र शासनाचे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज ‘सिन्नर सार्वजनिक वाचनालय’ हे ग्रामीण महाराष्ट्रातील आदर्श वाचनालय म्हणून लौकिकास आले आहे. ग्रंथसंस्कृतीचा प्रसार आणि संवर्धन करण्यामध्ये ‘ग्रंथस्नेही भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्णाजी भगत यांचे योगदान अत्यंत मौलिक आहे. वाचनालयाच्या माध्यमातून त्यांनी हजारो वाचकांना पुस्तकांची गोडी, विचारांची समृद्धी आणि संस्कारांची दिशा दिली.
 
दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या ग्रंथालय सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, विचारवंत आणि वक्त्यांना सिन्नरमध्ये आमंत्रित करून त्यांनी ज्ञानपरंपरेला अधिक समृद्ध केले. शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबरोबरच सिन्नरचा सांस्कृतिक वारसा जपण्यातही त्यांनी ऐतिहासिक योगदान दिले. सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक महोत्सव आणि विविध सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून त्यांनी सिन्नरच्या सांस्कृतिक ओळखीला नवे वैभव प्राप्त करून दिले. राजकीय क्षेत्रातही त्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. सध्या ते ‘मराठा विद्या प्रसारक समाज’ संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असून, सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, तसेच पदाधिकारी व संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीत सक्रिय योगदान देत असलेल्या सिन्नरच्या भूमिपुत्राला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.
संबंधित मजकूर