भिकार्‍यांच्या देशा...

    21-Aug-2026   
भिकार्‍यांच्या देशा...
 
इराण -अमेरिका युद्ध सुरू झाले, त्यावेळी संयुक्त अरब अमिरातीच्या ‘जनरल सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटी’चे विमान अनिश्चित काळासाठी रद्द झाले आणि विमानतळावर घोषणा करण्यात आली की, केवळ अमेरिकन आणि भारतीय पासपोर्टधारकांसाठीच हॉटेलची सोय करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर पाकिस्तानी प्रवाशांना हॉटेलमध्ये रूम देण्यासाठी नकार देण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांना तिथे कोणतीच सुविधा दिली गेली नाही. मीसुद्धा तिथे होतो. मुस्लीम देश असलेल्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुस्लीम देश असलेल्या पाकिस्तानच्या मुस्लिमांशी वाईट वर्तन करण्यात आले, भेदभाव करण्यात आला,” असे विधान पाकिस्तानी संसदेमध्ये खासदार असद कौसर यांनी केले. हीच खरं तर पाकिस्तानची लायकी! ‘खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा’ ही म्हण शतप्रतिशत जगणार्‍या लाचार पाकिस्तानला या घटनेमुळे संताप झाला आहे म्हणे!
 
तसा तो होणारच; कारण त्यांच्या मते, हिंदू असलेले भारतीय प्रवासी आणि ख्रिश्चन असलेले अमेरिकन प्रवासी हे काय पाकिस्तानी मुस्लिमांपेक्षा श्रेष्ठ आहेत? धर्मांधांच्या मते, जे मुस्लीम नाहीत, ते सर्व ‘काफिर’ असतात. ‘यूएई’ मुस्लीम राष्ट्र असूनही त्यांनी काफिरांचा आदर केला आणि मुस्लीम भाईंना मदत केली नाही, हे मत धर्मांधांचे असूच शकते. तसेही, जगभरात ५७ मुस्लीम देश आहेत. ते आपले साथीदार आणि पाठीराखे आहेत, असा गैरसमज का कोण जाणे, पाकिस्तानसह भारतातील काही विघातक लोकांमध्ये आहे. त्यामुळेच, पाकिस्तानी खासदार असद कौसर यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) त्यांचा झालेला अपमान सांगितल्यानंतर टिप्पणी केली की, ‘यूएई’ मुस्लीम देश आहे. मुस्लीम ‘ब्रदरहुड’ आपण मानतो. अमेरिका आणि इराण युद्धात पाकिस्तानने याच मुस्लीम ‘ब्रदरहुड’साठी ‘यूएई’ला साथ दिली. असे असताना ‘यूएई’ने पाकिस्तानी नागरिकांना पहिली मदत करायला हवी होती. तसे न करता, त्यांनी पाकिस्तानी नागरिकांशी दुर्व्यवहार केला.
 
पण, ‘यूएई’मध्ये हा अपमान पहिल्यांदाच झाला आहे का? तर, तसेही नाही. पाकिस्तानी नागरिक ‘प्रवासी व्हिसा’वर येतात आणि ‘यूएई’ किंवा अगदी सौदी अरबमध्येही भीक मागतात, असे या दोन्ही मुस्लीम देशांचे म्हणणे. मक्का आणि मदिना येथे तर एक-दोन वर्षांपूर्वीहजारो भिकार्‍यांवर कारवाई झाली. त्यावेळी त्या भिकार्‍यांमध्ये ९० टक्के भिकारी हे पाकिस्तानी नागरिक होते, हे उघड झाले. ‘प्रवासी व्हिसा’ घेऊन ते येथे आले होते आणि त्यांच्या देशाचा जागतिक धंदा (म्हणजे भीक मागणे) त्यांनी इथे सुरू केला होता. याबाबत पाकिस्तानवर या दोन देशांनी दबाव आणला, तेव्हा पाकिस्तानने प्रवाशांसाठी कडक नियमावली तयार केली. त्यामध्ये ४४ हजार नागरिकांना इतर देशांमध्ये जाण्यापासून पाकिस्तानी प्रशासनाने अडवले. कारण, कडक चौकशीत निष्पन्न झाले की, हे लोक खरोखर दुसर्‍या देशाते भीक मागण्यासाठी जाणार होते.
 
मागे तर पाकिस्तानच्या ‘ओव्हरसीज पाकिस्तानीज’ मंत्रालयाच्या सचिवाने सिनेट समितीच्या बैठकीमध्ये स्वीकार केले होते की, "यूएई’च्या श्रमिकवर्गाद्वारे होणार्‍या गुन्ह्यांमधले ५० टक्के लोक हे तिथे काम करणारे पाकिस्तानी कामगार असतात.”असो. त्यामुळेच की काय, पाकिस्तानी प्रवाशांना विमानतळावर उतरण्यास बंदी घालून तिथल्या तिथे त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठवण्याच्या कारवाया जगभरात अनेक देशांत झाल्या आहेत. यामध्ये अमेरिका, युरोप आणि आता मुस्लीम राष्ट्रेही आघाडीवर आहेत; तर जर्मनी, इटली आणि फ्रान्सच्या विमानतळावर पाकिस्तानी पासपोर्टधारकांची नेहमीच दोनवेळा सुरक्षा तपासणी होते. अधिकारी चौकशी करतात, जर उत्तर समाधानकारक मिळाले नाही; तर पाकिस्तान्यांना तत्काळ पुन्हा पाकिस्तानात पाठवले जाते.
 
पाकिस्तानी नागरिक आपल्या देशात येतील आणि आपल्या देशाला अस्थिर करतील, असे जगभरातल्या देशांना का वाटत असेल? अगदी मुस्लीम देशातील मुस्लिमांनाही असे वाटते. भारताशी जन्मजात वैर आणि द्वेषभाव असलेल्या पाकिस्तानची ही जगभरातली अशी भुकेकंगाल आणि अपराधी प्रतिमा आहे. ती आता बदलता येणार नाही. पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर ८० वर्षांत ही ओळख मिळवली आहे, बरे!




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर