मुंबईकरांनी दिमागी नक्षलीपासून सावध राहावे; मंत्री आशिष शेलार

गणेश मुर्तीकारांमध्ये विभाजन करण्याची भूमिका आदित्य ठाकरेंची

    21-Aug-2026   
Ashish Shelar Ganeshotsav
 
मुंबई : (Ashish Shelar Ganeshotsav) गणेशमूर्ती तयार करण्यापासून त्यांचे विसर्जन, गणेशोत्सवातील सजावट, रोषणाई आणि उत्सवाच्या विविध परंपरांवर सातत्याने आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती 'दिमागी नक्षली' असून त्यांच्यापासून मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे. तसेच सर्वात आधी गणेश मुर्तीकारांमध्ये विभाजन करण्याची भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली, अशी टीकाही त्यांनी केली.
 
पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दि. २४ जुलै २०२५ रोजी दिलेले निर्देश कायम ठेवले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेला न्यायालयीन मान्यता मिळाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. या लढाईत गणेशोत्सव महासंघ, मुर्तीकार संघटना, उत्सव समिती, समन्वय समिती, गणेशोत्सव मंडळे या सगळ्यांनी लढाई एकत्रितपणे लढले असून त्यांचेही आभार मानतो." (Ashish Shelar Ganeshotsav)
 
 
 
ते पुढे म्हणाले की, “मुंबई महापालिकेत २०१८ मध्ये गणेशमूर्तीकारांमध्ये विभागणी करण्याची भूमिका सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांनी घेतली. शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि पीओपी मूर्ती असा भेद करण्यामागचे कारण काय? लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईतील अन्य पारंपरिक गणेशमूर्ती कशा पद्धतीने तयार होतात, त्यांची परंपरा काय आहे, याची कल्पना आदित्य ठाकरे यांना आहे का? या मूर्तींच्या विसर्जनाबाबत जे न्यायालयात गेले, त्यांच्या भूमिकेविरोधात तुम्ही आवाज का उठवला नाही? तुमचा या प्रवृत्तींशी काही संबंध आहे का? या लोकांशी तुमची चर्चा होते का? मुंबईतील पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अडथळा निर्माण करणाऱ्यांशी तुमचा साटेलोटे तर नाही ना?” असा सवाल त्यांनी ठाकरेंना केला. (Ashish Shelar Ganeshotsav)
 
कोरोनाच्या काळात अनेक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक मर्यादा पाळून उत्सव साजरा केला होता. मात्र, शंभर वर्षांची परंपरा असलेला लालबागचा राजा त्या काळात प्रथमच विराजमान झाला नाही, यामागे तत्कालीन सरकारची भूमिका होती. भाजप २०१३ पासून गणेशभक्त, मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या प्रश्नांसाठी लढत असून पर्यावरणाचे रक्षण करताना गणेशोत्सवाच्या परंपरेला धक्का लागू नये, अशी पक्षाची भूमिका आहे. (Ashish Shelar Ganeshotsav)
 
नागरिकांनी सजग राहावे
 
“गणेशमूर्तीला कोणता रंग लावावा, मूर्तीचे विसर्जन कसे करावे, मूर्ती पर्यावरणाला कशी हानिकारक आहे, सणासुदीच्या काळातील रोषणाई आणि सजावट कशी असावी, अशा अनेक बाबींवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. या सगळ्या मांडणीच्या आधारे न्यायालयात दावे दाखल केले जातात. गणपतीच्या मूर्ती बनवणे, त्यांचे प्रदर्शन व विक्री करणे, सजावट करणे, उत्सव साजरा करणे आणि विसर्जन करणे यावर कायदेशीर मर्यादा आणण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याबाबत नागरिकांनी सजग राहिले पाहिजे. गोविंदा आणि अन्य पारंपरिक उत्सवांबाबतही अशाच प्रकारे अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. कुंभमेळा आणि नागपंचमीसारख्या परंपरांबाबतही आक्षेप घेणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी या ‘दिमागी नक्षली’ आणि त्यांच्या भूमिकेला सहकार्य करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे," असे आवाहन मंत्री आशिष शेलार यांनी केले. (Ashish Shelar Ganeshotsav)
 
काँग्रेसचा फर्जीवाडा उघड
 
राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाबद्दल समाज माध्यमावर व्हायरल झालेला व्हिडीओ स्पष्ट आहे. त्यामध्ये काँग्रेसचा माणूस पैसे देण्याची ऑफर करतोय. यातून काँग्रेसचा फर्जीवाडा उघड झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी याची चौकशी करावी. ही ऑफर देणारा आणि त्यामध्ये पैसा कुणाचा आहे? हे २५ हजार रुपये किती लोकांना देऊ इच्छित आहेत? त्यात येणारा पैसा कुठून येतोय? तो काँग्रेस कार्यालयातून येतोय? टिळक भवन मधून येतोय? की, विदेशातून आर्थिक मदत मिळवणाऱ्या संघटना काँग्रेसच्या माध्यमातून? याची चौकशी सखोल झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (Ashish Shelar Ganeshotsav)
 
गोरेगावच्या प्रबोधनवर मोर्चा काढणार का?
 
वांद्रे येथील फुटबॉल मैदानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "वांद्रे पश्चिम येथील फुटबॉल मैदानाबाबत न्यायालयात लढाई सुरु आहे. लढाई आता पूर्ण होऊ द्या, न्यायालयाचा निर्णय घेऊ द्या, मग सविस्तर बोलू. आज मोकळ्या भूखंडाच्या बाबतीत जे कोल्हेकुई करतात त्यांना माझे थेट आव्हान आहे की, पहिला मोर्चा गोरेगावच्या प्रबोधनवर काढणार का मोकळ्या भूखंडावर जर आवाज उठवताय तर दहिसर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काय? भूखंड कोणाचा आहे? कोणाच्या मालकीचा आहे? मी आज वाणगीदाखल काही उदाहरणे दिली आहे. यांची जंत्री मी सविस्तरपणे मांडेन." (Ashish Shelar Ganeshotsav)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर