मुंबई : (Safe Maharashtra Campaign) अन्नपदार्थ आणि दुध भेसळीवरील धडक कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा भेसळयुक्त खाद्यतेलाकडे वळवला आहे. त्यांनी खाद्यतेलासंदर्भात विशेष ‘कंप्लायंस ऑर्डर’ जारी करून राज्यात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबद्दलची माहिती दिली.
तुकाराम मुंढे म्हणाले की, 'सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र' या मोहिमेअंतर्गत खाद्य तेलाबद्दल महत्वाची ऑर्डर आपण काढत आहोत. गेल्या काळात काही तपासणी केली असता खाद्य तेलाच्या बाबतीत आम्हाला काही त्रुटी आढळल्या आहेत. नोंदणी न केलेल्या काही खाद्य तेल उत्पादक कंपन्या आम्हाला मिळाल्या असून ते अपेक्षित नाही. तसेच खाद्य तेलाची भेसळ करण्याचा प्रकार आम्हाला आढळला.(Safe Maharashtra Campaign)
मोहरी तेलात अनधिकृत मिश्रण केले जात असल्याचे आढळून आले असून याबाबत परवानगी नाही. मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग करून ते पुढच्या काळासाठी वैध दाखवत असल्याचे प्रकार आढळले. या प्रकारचे उल्लंघन आढळल्यामुळे त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. सुट्या स्वरूपात तेल विक्री करत असल्याचे तसेच वापरलेल्या, गंजलेल्या आणि अन्नायोग्य नसलेल्या डब्यांमध्ये खाद्यतेल भरून त्याची विक्री केली जात असल्याचेही आमच्या निदर्शनास आले आहे.”(Safe Maharashtra Campaign)
मोहरी तेलात मिश्रण करण्यास बंदी
“खाद्य तेलाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आस्थापनांना जवळपास ८ ते ९ नियम लागू होतात. खाद्य तेलाच्या उद्योगात काम करणाऱ्या सर्वांनाच हे आदेश लागू असेल. किराणा दुकानदार, ऑनलाइन विक्रेते, आयातदार, घाऊक विक्रेते, वितरक, सुपरमार्केट, उत्पादनापासून ते विक्री करणाऱ्या प्रत्येकाला हे आदेश लागू असतील. महाराष्ट्रात आज ४९७ परवाने नोंदणीकृत आहेत.(Safe Maharashtra Campaign)
खाद्यतेलाची विक्री सुट्या स्वरूपात करता येत नाही हा नियम आधीपासून आहे. पॅकेजिंगमध्येच खाद्य तेलाची विक्री केली जाईल. किरकोळ विक्रेत्यांनी सुद्धा सुट्टे स्वरूपात तेल घेऊ नये. बहुस्त्रोत खाद्य वनस्पती तेल आणि मोहरी तेलाबाबत विशिष्ट सूचना आहे. त्यांनी सीलबंद वेष्टनातच तेलविक्री करणे अपेक्षित आहे. मोहरी तेल १०० टक्के शुद्ध मोहरी तेल म्हणून विकावे लागेल, त्यात मिश्रण करता येणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.(Safe Maharashtra Campaign)
ते पुढे म्हणाले की, “सध्या सुट्टे तेल मोठ्या प्रमाणावर विकले जात असून हे तेल कधी आणि कुठून आले याचे स्रोत माहिती नसतात. हे सुरक्षित नाही, यामुळेच विषबाधा होण्याची शक्यता असते. बऱ्याचदा वापरलेल्या किंवा गंजलेल्या टिनाच्या डब्याचा पुनर्वापर केला जातो. तसेच, मोठ्या हॉटेल्समध्ये तळणीचा तेलाचा वापर वारंवार केला जातो. त्याचा आरोग्यावर मोठा परिणाम होत असून विविध आजार होऊ शकतात.”(Safe Maharashtra Campaign)
भेसळ केल्यास १० लाख रूपये दंड
“खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास ७ वर्षांपासून तर आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा आहे. तेलात भेसळ केल्यास १० लाखापर्यत दंड आहे, विनापरवाना आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी १० लाखापर्यत दंड आहे,” अशी माहितीही तुकाराम मुंढेंनी दिली.(Safe Maharashtra Campaign)
ग्राहकांना आवाहन
“ग्राहकांनी सुट्टे तेल विकत घेऊ नये. तेल पॅकिंग केलेले असल्यास त्याचे लेबल, सील, मुदत हे सगळे बघा. जुन्या, गंजलेल्या किंवा पुनर्वापर केलेल्या डब्यातील तेल विकत घेऊ नये. घरात वारंवार तळणीचे तेल वापरू नका. ही समस्या फक्त फसवणुकी पुरता मर्यादित नाही तर, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मेंदू विकार, कर्करोग, उच्च रक्तदाब असे आजार बळावतात. आरोग्याशी खेळणारे भेसळयुक्त तेल असून त्यावर आळा घालण्यासाठी हे नियम आणले आहेत,” असे आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केले आहे.(Safe Maharashtra Campaign)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....