नागपूर : (Chandrashekhar Bawankule) शेतजमिनीचे सपाटीकरण, शेतरस्ते व वहिवाटीचे रस्ते तयार करणे, तसेच शेतीच्या उपयोगासाठी जमीन तयार करण्यासाठी लागणारी माती आणि मुरूम यावर आता शेतकऱ्यांना कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही. या कामासाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर तलाठी, तहसीलदार किंवा पोलिसांकडून कारवाई केली जाणार नाही, असे महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या वाळू धोरणासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, "यापूर्वी माती किंवा मुरूम वाहतूक करताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात असल्याच्या तक्रारी होत्या. आता शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. शेतात सपाटीकरण करणे, शेतरस्ता किंवा वहिवाटीचा रस्ता तयार करणे, शेतात घर बांधणे अथवा शेतीयोग्य जमीन तयार करणे यासाठी लागणाऱ्या गौण खनिजावर रॉयल्टी आकारली जाणार नाही. अशा कामासाठी माती कुठून आणली याबाबत स्वतंत्र मंजुरीची आवश्यकता राहणार नाही." (Chandrashekhar Bawankule)
"मात्र, महसुली नाल्यातून माती काढायची असल्यास तलाठ्याची परवानगी घेणे आवश्यक राहील. शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या माती-मुरुमावर मात्र रॉयल्टी आकारली जाणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. (Chandrashekhar Bawankule)
भूतकाळाच्या गप्पांपेक्षा वर्तमान आणि भविष्याची चिंता करा
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, “मग त्यावेळी का नाही सरकार बनवले? कोणी मनाई केली होती? शिळ्या भाकरी का खाता? आता वर्तमानाबद्दल बोला. भविष्यात कोणी काय केले याची आत्मकथा लिहावी, मात्र माध्यमांमध्ये अशा पुड्या सोडणे योग्य नाही. भूतकाळावर कोणी विश्वास ठेवत नाही. वर्तमान आणि भविष्याची काळजी घेण्याची गरज आहे," असा टोला त्यांनी लगावला. (Chandrashekhar Bawankule)
राहुल गांधींचा पाया ढासळला
राहुल गांधींचा पाया ढासळला आहे. गर्दी जमा होत नाही, मान्यता मिळत नाही. त्यामुळे एखादा मुद्दा हातात घेऊन काहीतरी होईल, या अपेक्षेने त्यांचे राजकारण सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच वंदे मातरमच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, एखादी तांत्रिक चूक झाली असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे. मात्र, भाजपच्या सभा, विधिमंडळ तसेच राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये पूर्णपणे वंदे मातरम गायले जात आहे. देशाच्या सरकारने केलेल्या नियमांचे पालन झाले पाहिजे आणि वंदे मातरम पूर्ण गायले गेले पाहिजे. वंदे मातरम हे देशाच्या संस्कार, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असून, भारतमातेला सर्वोच्च स्थान आणि तिरंग्याला सर्वोच्च मान देण्याची भावना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. (Chandrashekhar Bawankule)
अंगणवाडी सेविकेवरील कारवाईची माहिती घेणार
अंगणवाडी सेविकेच्या निलंबनाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, "मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तिने योग्य पद्धतीने सरकारसमोर विषय मांडला असेल तर तिच्यावर कारवाई करणे योग्य नाही. मात्र, नेमक्या कोणत्या कारणामुळे कारवाई झाली हे पाहावे लागेल. पुरवठ्यात काही गैरप्रकार किंवा इतर नियमभंग झाला असेल तर त्याची माहिती घेऊन आपणही लक्ष घालू," असे त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
साखरेच्या दरवाढीवर केंद्राशी चर्चा
साखरेच्या दरवाढीबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे लक्ष दिले आहे. साखरेचा साठा, पुरवठ्यातील तफावत किंवा इतर कारणांमुळे दरवाढ झाली असण्याची शक्यता आहे. केंद्राशी चर्चा करून यावर मार्ग काढला जाईल, असे बावनकुळे म्हणाले. साखरेऐवजी थेट इथेनॉल निर्मितीकडे काही कारखाने वळत असल्याने साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबीकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
भाजपमध्ये कोणालाही पंतप्रधान होण्याची घाई नाही
"भाजप हा कौटुंबिक व्यवस्थेतून चालणारा पक्ष नसून संघटनात्मक व्यवस्थेतून निर्णय घेतले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत असून, पंतप्रधान होण्याची कोणालाही घाई नाही," असे उत्तर त्यांनी विरोधकांना दिले. (Chandrashekhar Bawankule)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....