मुंबई (Siddhivinayak Temple Beautification) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण आणि विकास प्रकल्पाला राज्य सरकारकडून गती दिली जात असतानाच, एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुकर दर्शनासाठी नियोजित असलेल्या मंदिर प्रवेशद्वाराच्या विकासकामांना परिसरात असलेल्या ‘कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. इतकेच नव्हे, तर या विरोधासाठी शाळा प्रशासनाने पालकांची थेट दिशाभूल करत त्यांच्याकडून फसवून सह्या लाटल्याचा गंभीर प्रकार सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी उघडकीस आला.
शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासा’चे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना या संपूर्ण घटनेबाबत माहिती दिली. समाधान सरवणकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरसुद्धा या संपूर्ण वादासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर प्रकरण जाणून घेण्यासाठी जेव्हा दै. ‘मुंबई तरुण भारत’ने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला, तेव्हा शाळेत घडलेला एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (Siddhivinayak Temple Beautification)
पालकांच्या छुप्या कागदावर घेतल्या सह्या
पालकांनी असा आरोप केला की, मंदिर सुशोभीकरणाच्या कामाला शाळेचा विरोध असून पालकांचाही या कामास विरोध आहे, हे दाखवण्यासाठी शाळा प्रशासनाने पालकांना अंधारात ठेवून त्यांच्या नकळत त्यांच्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला. सोमवारी शाळेचा ‘ओपन डे’ होता. त्यानिमित्ताने पालकदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या शिक्षकांनी पालकांना ‘अटेंडन्स’ म्हणून सह्या करण्यासाठी एक कागद दिला होता. त्याच्या खाली आणखी एक कागद होता. त्याची कल्पना पालकांना देण्यात आली नव्हती. मात्र, त्यावरसुद्धा सह्या करण्यास सांगितले होते. (Siddhivinayak Temple Beautification)
हा छुपा कागद नेमका कशासाठी आहे, याची कोणतीही पूर्वकल्पना पालकांना देण्यात आली नव्हती, असा पालकांचा आरोप आहे. काहींनी जेव्हा सह्यांबद्दल विचारणा केली, तेव्हा उपस्थित शिक्षकांनी उत्तर देणे टाळले. पालकांनी खडसावून जाब विचारल्यानंतर एका शिक्षिकेने तोंडी कबुली दिली की, "शाळेच्या परिसरात होणार्या मंदिराच्या नव्या प्रवेशद्वाराला विरोध दर्शवण्यासाठी या सह्या घेतल्या जात आहेत,” असे पालकांनी सांगितले. त्यामुळे अशा प्रकारे पालकांची फसवणूक केल्याने हायस्कूल प्रशासनाविरुद्ध पालकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. (Siddhivinayak Temple Beautification)
शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
प्रकरण समोर येताच, दै. ‘मुंबई तरुण भारत’ने शाळेच्या मुख्याध्यापिका आशा अल्मेडिया यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. शाळेच्या वेबसाईटवरील फोन नंबर, ईमेलवरून प्रशासनापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला; परंतु संपर्क झाला नाही. अखेर गुरुवारी शाळेला भेट दिली असता, मुख्याध्यापिका अनुपस्थित असल्याचे समजले. दि. १७ ऑगस्ट रोजी शाळेच्या ‘ओपन डे’च्या दिवशी नेमके काय घडले, याची माहिती शाळा प्रशासनातील अन्य अधिकारी आणि शिक्षकांनी दिली. (Siddhivinayak Temple Beautification)
हिंदू विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक
आजही विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्मांवरून भेदभावाची वागणूक या शाळेकडून दिली जाते, असे काही वेळेस भासते. प्रवेशावेळीसुद्धा अशा वागणुकीची जाणीव होते. मुळात श्री सिद्धिविनायक मंदिराचे जर सुशोभीकरण होत असेल, तर आमचा त्याला विरोध का असावा आणि जर शाळेला सह्या घ्यायच्याच होत्या, तर उघड-उघडपणे त्यांना का घेता आल्या नाहीत? अशा छुप्या पद्धतीने सह्या घ्यायची काय गरज होती? पालकांना अंधारात ठेवून अशा प्रकारे सह्या घेणे चुकीचे आहे.- पालक क्र. १ (Siddhivinayak Temple Beautification)
पालकांशी चर्चा करायला हवी होती
‘कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल’च्या प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाबाबत आम्हा पालकांना पूर्णपणे अंधारात ठेवल्याचे दिसते. पालकांना अंधारात ठेवून अशा प्रकारे स्वतःच्या अजेंड्यासाठी आमचा वापर व्यवस्थापनाने करणे पूर्णपणे चुकीचे आहे. जर शाळेला एखाद्या प्रकल्पाबाबत काही आक्षेप किंवा शंका असत्या, तर त्यांनी पालकांशी पारदर्शकपणे चर्चा करायला हवी होती. एका प्रतिष्ठित शाळेकडून अशा प्रकारच्या गैरवर्तनाची आम्हाला अपेक्षा नव्हती. त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन जर ही गोष्ट सांगितली असती, तर विषय तिथल्या तिथेच संपला असता. - पालक क्र. २
शाळा प्रशासनाचे म्हणणे काय?
शाळा प्रशासनाचा दावा आहे की, ‘ओपन डे’च्या दिवशी पालकांना सह्या करण्यापूर्वी पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे पालकांची डोळेझाक करून सह्या घेतल्या, हा आरोप चुकीचा आहे. ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास’नेसुद्धा शाळा व परिसरातील सोसायट्यांना विश्वासात घेऊन मागील बाजूस कॉरिडोरच्या निमित्ताने काय होणार आहे, याबाबत सांगायला हवे होते. पालकांच्या सह्या घेणे गरजेचे होते, कारण मुलांना सोडताना पालकांच्या गाड्या गेटजवळ लागतात. या स्थितीत मंदिराचे प्रवेशद्वार आल्यास मुलांना त्रास व्हायला लागला असता म्हणून पालकांच्या सह्या घेणे आवश्यक होते. (Siddhivinayak Temple Beautification)
आणखी किती गप्प बसायचे?
श्री सिद्धिविनायक न्यासा‘वर इतर पक्षाचे ट्रस्टी आले, म्हणून हा विरोध होत आहे का, असा प्रश्न आहे. हा लढा आता पक्षांचा राहिलेला नसून धर्माच्या रक्षणाचा आहे. दुर्दैव म्हणजे, या शाळेसाठी काही राजकीय मंडळी मैदानात उतरली आहेत व आपल्या देवस्थानाच्या कामाला विरोध करत आहेत. त्यामुळे आता किती गप्प बसायचे, हे आपणच ठरवायला हवे. आता प्रश्न फक्त राजकारणाचा नाही, आता प्रश्न आहे, आपल्या श्रद्धेचा, आपल्या देवस्थानाच्या हक्काचा! - समाधान सरवणकर, माजी नगरसेवक (Siddhivinayak Temple Beautification)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक