पर्यटन, निसर्ग शिक्षण आणि संवर्धनाचा दृष्टिकोन बाळगणार्या कोयना वन्यजीव अभयारण्यातील निसर्ग विस्तार अधिकारी सचिन मोहन धायगुडे यांच्याविषयी...
सह्याद्रीच्या जंगलात वन्यजीव पाहणे अनेकांसाठी कुतूहलाचा विषय. मात्र, या जंगलातील प्रत्येक जीवाची नोंद घेणे, त्याचा अधिवास समजून घेणे आणि ही माहिती समाजापर्यंत पोहोचवणे, हे काही मोजक्या निसर्गप्रेमींचे काम असते. सचिन धायगुडे यांनी गेल्या दीड दशकात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधतेशी अशीच नाळ जोडली. वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार, निसर्गशिक्षक आणि जनजागृती करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सह्याद्रीच्या संवर्धनात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
दि. ३ नोव्हेंबर १९९० रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे त्यांचा जन्म झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण श्रीरामपुरातच झाले. ‘राज्यशास्त्र’ विषयातून त्यांनी पदवी घेतली. शिक्षणाबरोबरच क्रिकेटची त्यांना विशेष आवड होती. पुढे श्रीरामपुरात ‘चॅम्पियन्स क्रिकेट अॅकेडमी’ स्थापन करून १९ वर्षांखालील मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले. मात्र, त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारी गोष्ट होती ती म्हणजे, निसर्गाशी जडलेले नाते. त्यांचे वडील प्राध्यापक मोहन धायगुडे यांनी त्यांना निसर्गाची ओळख करून दिली. ‘रयत शिक्षण संस्थे’त शिक्षक असलेल्या वडिलांची पहिली नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत येथे झाली होती. १९८०च्या दशकात लोणंद ते पालशेत प्रवास करताना कुंभार्ली घाटात त्यांना अनेकदा वाघ दिसल्याच्या आठवणी ते सचिन यांना सांगत. या कथांनी त्यांच्या मनात सह्याद्रीच्या जंगलाविषयी कुतूहल निर्माण केले. २०११ मध्ये त्यांनी प्रथम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भेट दिली. याच काळात राहुल यादव या मित्राच्या सहकार्याने त्यांनी सह्याद्रीच्या जैवविविधतेचा अभ्यास सुरू केला.
या भ्रमंतीदरम्यान स्थानिकांकडून वन्यजीवांची शिकार होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन शिकार्यांशी संवाद साधून त्यांनी ‘वन्यजीव मारण्याऐवजी ते लोकांना दाखवून तुम्हाला रोजगार मिळू शकतो,’ हा विचार पटवून दिला. या संवादातून दोघांचे मतपरिवर्तन झाले आणि पुढील सुमारे दहा वर्षे त्यांना निसर्ग पर्यटनातून रोजगार मिळवून दिला. त्याचबरोबर स्थानिकांमध्ये वन्यजीव संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कामही सुरू झाले. यादरम्यान, त्यांना कोल्हापूरचे पर्यावरणतज्ज्ञ सुहास वायंगणकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. धायगुडे यांच्या निसर्ग निरीक्षणाला वैज्ञानिक दस्तऐवजीकरणाची जोड मिळाली ती ‘लार्ज हॉक कुक्कू’च्या नोंदीमुळे. २०१९ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून या पक्ष्याची महाराष्ट्रातील पहिली नोंद त्यांनी राहुल यादव यांच्या सहकार्याने केली. या नोंदीचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण ‘इंडियन बर्ड्स’ या दक्षिण आशियातील पक्षीविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. २०२३ मध्ये याच परिसरातून या पक्ष्याची महाराष्ट्रातील दुसरी नोंदही झाली.
२०२२ मध्ये त्यांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्ग विस्तार अधिकारी’ म्हणून निवड झाली. त्यानंतर ‘सह्याद्री निसर्ग शिक्षण व जनजागृती’ उपक्रमातून बफर क्षेत्रातील आणि बफरलगतच्या सुमारे १०० शाळा व गावांमध्ये सातत्याने जनजागृती केली. मानव-वन्यजीव संघर्ष, वनवणवा प्रतिबंध, सर्प, घुबड आणि गिधाड संवर्धन, तसेच ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास’ योजना आणि उपजीविकानिर्मिती अशा विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. निसर्गशिक्षणाच्या त्यांच्या दृष्टिकोनात एक महत्त्वाची बाब म्हणजे जंगलाकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून न पाहता, ते एक जिवंत परिसंस्था म्हणून समजून घेणे. आजवर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील विविध वन्यजीवांचे त्यांनी छायाचित्रण केले आहे. प्रकल्पाच्या ‘टायगर कॅन्झर्वेशन प्लॅन’साठी वन्यजीवांच्या ‘चेकलिस्ट’ तयार करण्याच्या कामातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
व्याघ्रसंवर्धनाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघ स्थानांतरणाच्या प्रक्रियेत त्यांनी क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण व उपसंचालक किरण जगताप, स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची भूमिका बजावली. ‘चंदा’, ‘तारा’ आणि ‘हिरकणी’ या वाघिणींचे छायाचित्रण व दस्तऐवजीकरण केले. कोयना अभयारण्यात कॅमेरा ट्रॅपद्वारे वाघांच्या संनियंत्रणातही त्यांनी काम केले. हिरकणी वाघीण दोन महिने कोकणात गेल्यानंतर तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी विशेष जबाबदारी पार पाडली. रात्री ड्रोनच्या साहाय्याने तिचे निरीक्षण करण्याबरोबरच स्थानिक नागरिकांमध्ये वाघाविषयी जनजागृती केली. या कार्याची दखल घेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने त्यांचा दोनवेळा सन्मान केला.
निसर्गसंवर्धनातील या सातत्यपूर्ण कार्यासाठी २०२४ मध्ये ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या ‘वसुंधरामित्र निसर्गरक्षक पुरस्कार’ने त्यांचा गौरव झाला. क्रिकेटच्या मैदानापासून सह्याद्रीच्या जंगलापर्यंतचा सचिन धायगुडे यांचा प्रवास हा केवळ आवडीचा प्रवास नाही; तो निसर्ग समजून घेण्याचा, स्थानिकांना संवर्धनाशी जोडण्याचा आणि पुढील पिढीला जंगलाची भाषा शिकवण्याचा प्रवास आहे. सह्याद्रीतील जैवविविधतेचा अभ्यासक, तिचे दस्तऐवजीकरण करणारा आणि संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणारा निसर्गदूत, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख म्हणावी लागेल. त्यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!