उच्च शिक्षणासाठी मुलींना आर्थिक आधार; दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी देण्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

    20-Aug-2026   
 
₹2,000 Monthly Pocket Money
 
मुंबई (₹2,000 Monthly Pocket Money) : मुलींना उच्च शिक्षण घेताना आर्थिक मदत आणि आत्मविश्वासपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांना कमवा आणि शिका या धर्तीवर दरमहा दोन हजार रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याबाबत विद्यापीठ, महाविद्यालयात सीएसआरच्या माध्यमातून उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
 
त्यांनी मंत्रालयात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैयक्तिक अडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे होणारे फायदे, तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य, रुईया महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. (₹2,000 Monthly Pocket Money)
 
 
 
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आपल्या वेळेचा सदुपयोग विधायक कामांसाठी करत सामाजिक जाणीव जोपासावी. समाजाच्या गरजा आणि स्वतःची आवड, क्षमता ओळखून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा. विद्यार्थीदशा ही व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात समाजासाठी काम करण्याची वृत्ती महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे.”
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि संवादाची गरज
 
“इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाचा केवळ अभ्यास न करता तो जपण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. ऐतिहासिक वारसा, वास्तू आणि सांस्कृतिक ठेवा यांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी इंटर्नशिपच्या संधी अधिक व्यापक करण्यावरही भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना मार्गदर्शन आणि संवादाची गरज असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मोकळेपणाने मांडावेत आणि महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांशी नियमित संवाद ठेवावा,” असे आवाहनही त्यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयांना केले. (₹2,000 Monthly Pocket Money)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर