बहुविषयक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शैक्षणिक संस्थांनी कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर द्यावा

    02-Aug-2026   
Devendra Fadnavis
 
नागपूर : (Devendra Fadnavis) आज कोणतेही क्षेत्र एका चौकटीत राहिलेले नाही. अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी किंवा इतर कोणतीही शाखा, आता स्वतंत्रपणे शिक्षण घेऊन चालणार नाही. बहुविषयक दृष्टिकोन स्वीकारणे काळाची गरज बनली आहे. जगाचा इतिहास पाहिला तर मोठ्या नवकल्पना उद्योगक्षेत्रातून नव्हे, तर विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधूनच उदयास आल्या आहेत. त्यामुळे ज्ञाननिर्मिती, संशोधन आणि नावीन्य यांचा केंद्रबिंदू म्हणून विद्यापीठांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.(Devendra Fadnavis)
 
रामदेवबाबा विद्यापीठातील ‘एआय सेंटर फॉर कॉम्पिटन्सी’च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी श्रीरामदेवबाबा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष पद्मश्री सत्यनारायण नुवाल, उपाध्यक्ष एस. राठी, पी. पालडीवाल, महासचिव राजेंद्र पुरोहित, सचिव अॅड प्रदीप अग्रवाल यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.(Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे. आजच्या नोकऱ्यांच्या क्षेत्राला केवळ पदवीधरांची गरज नाही, तर अर्थपूर्ण योगदान देणाऱ्या गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकॉन आणि क्वांटम कम्प्युटिंग तंत्रज्ञान हे या शतकाच्या भविष्याला आकार देणारे प्रमुख घटक ठरणार आहेत. तंत्रज्ञानातील वेगवान बदलांमुळे आज २०२६ मध्ये आपण पाचव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा करीत आहोत. ही क्रांती कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप टेक्नॉलॉजी आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आता जगाने सहाव्या औद्योगिक क्रांतीची चर्चा देखील सुरू केली आहे."(Devendra Fadnavis)
 
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार
 
 
 
ते पुढे म्हणाले की, "ज्या प्रचंड वेगाने तंत्रज्ञान तसेच व्यवसायाचे स्वरूप बदलत आहे, ते लक्षात घेता आपल्या शैक्षणिक संस्थांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येत्या एक हजार दिवसांत नोकऱ्यांच्या क्षेत्रातील सुमारे ७० टक्के नोकऱ्यांचे स्वरूप आमूलाग्र बदलणार आहे. नोकऱ्या कमी होणार नाहीत, मात्र त्यांचे स्वरूप निश्चितच बदलेल. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हा बदल अटळ आहे. त्यामुळे जग ज्या वेगाने बदलत आहे, त्या वेगाशी सुसंगत राहण्यासाठी आपल्या शिक्षण संस्थांनाही शिक्षणाच्या पद्धतीत बदल करावे लागतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातही व्यापक बदल घडत आहेत. रोगांच्या व्यवस्थापनात आमूलाग्र बदल झाले आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया असलेले कृषी क्षेत्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक लाभ होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे."(Devendra Fadnavis)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर