देवेंद्र फडणवीस राज्याचे मजबूत मुख्यमंत्री; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; राऊतांच्या वावड्यांना अर्थ नाही

    02-Aug-2026   
Chandrashekhar Bawankule
 
रत्नागिरी : (Chandrashekhar Bawankule) संजय राऊत यांना तिसरा डोळा आहे का, ते माहिती नाही. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मजबूत मुख्यमंत्री आहेत. विकसित महाराष्ट्राचा संकल्प तेच पूर्ण करू शकतात. त्यामुळे या वावड्यांना काहीही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान मोदी यांनी केंद्रात मंत्रीपद स्विकारण्यास सुचवल्याचा दावा उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आमच्या सर्वांच्या हृदयात आहेत. संजय राऊतांनी तर बाळासाहेबांचे विचार सोडून शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली. मतांच्या लांगुलचालनासाठी तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात. अशा वेळी तुम्ही कुणाला संस्कार शिकवता? बोलणे सोपे आहे पण वागणे कठीण आहे. उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्ष ज्यादिवशी बाळासाहेबांचे विचार अंगीकारतील त्या दिवशी खरी शिवसेना तयार होईल."(Chandrashekhar Bawankule)
 
महायुतीत असे वर्तन योग्य नाही
 
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेतली. यावर बोलताना ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्या नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे. महायुतीत काम करताना असे वर्तन करणे योग्य नाही."(Chandrashekhar Bawankule)
 
सरकारलाच दोषी धरणे योग्य नाही
 
राज ठाकरे यांनी राम मंदिर चोरी आणि श्री सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "राम मंदिर चोरीचे प्रकरण आम्हीच उघड केले असून आम्हीच त्यावर कारवाई करतो आहोत. फक्त तोंडाने बोलून काहीही होणार नाही. आमचे सरकार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही काम करत आहे. राज ठाकरे यांनी विधायक सूचना दिल्यास त्याचा सरकार नक्की विचार करेल. पण सरकारनेच सिद्धिविनायक मंदिरातून पैसे काढले, असे म्हणणे बरोबर नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सिद्धिविनायक मंदिरात झालेला भ्रष्टाचार ठाकरेंनीच केला असे म्हणायचे का? सरकारलाच यात दोषी धरणे योग्य नाही."(Chandrashekhar Bawankule)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर