मुंबई : (Ashish Shelar) संजय राऊत यांना विक्षिप्त, अविवेकवादी आणि वेडेपणाची वक्तव्ये करण्यासाठी नोबेल पुरस्कार दिला पाहिजे असे मला वाटते, असा टोला सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी लगावला. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशा पद्धतीची भूमिका मांडणाऱ्या संजय राऊत यांना लपणे, लपून राहणे अशा कार्यपद्धतीची सवय असेल. भाजप आणि अमित शाह यांना ती सवय नाही."(Ashish Shelar)
राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचा आदर्श घ्यावा
"राज ठाकरेंनी भूमिका मांडल्यानंतर शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच्या सामान्य माणसांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. त्यावर राज ठाकरेंचे आणि त्यांच्या पक्षाचे वक्तव्य बघावे. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच्या लोकांना ठोकून काढा असे त्यांचे वक्तव्य होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहनशीलता, प्रामाणिकपणा आणि समंजसदारपणाने जेन झी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना समजावून घेत जो व्हिडिओ बनवला आहे त्यातून राज ठाकरेंनी आदर्श घ्यावा. आंदोलनातील अश्लील भाषेचे, समाज माध्यमांवरील अश्लील प्रतिक्रियांचे मनसे आणि उबाठा सेना समर्थन करीत असेल तर, त्यांच्या मेंदूत केमिकल लोचा झाला का? हे तपासावे." असेही ते म्हणाले.(Ashish Shelar)
काँग्रेसचा अभ्यास कच्चा
"काँग्रेसचा अभ्यास कच्चा आहे, काँग्रेसच्या नेत्यांना विपर्यासाचे भूत लागले असून त्यांच्या भूमिका सत्याधारित नाहीत. संसदेत आणि संसद भवनात अमित शाह होते. ते लोकशाही मार्गाने सगळे काम करत होते. परंतू, या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मूळ मुद्याला बगल देऊन राजकीय द्वेषापोटी काँग्रेस हे आंदोलन करत आहे. स्वत:चा पक्ष वाचवण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न आहे," अशी टीकाही त्यांनी केली.(Ashish Shelar)
अमीत साटम सक्षमपणे काम करत आहेत
"भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम हे सक्षमपणे आणि तळमळीने काम करत आहेत. जुहू चौपाटीच्या स्वच्छतेसंदर्भात त्यांनी बैठक घेतल्याची माहिती मला आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी त्याबाबतची सविस्तर माहितीही मला दिली आहे. त्यामुळे ते प्रामाणिकपणे आणि सातत्याने रस्त्यावर उतरून काम करत आहेत. महापालिकेने स्वच्छतेचे काम तर सचोटीने आणि परिपूर्णतेने केलेच पाहिजे. पालकमंत्री म्हणून त्यावर देखरेख ठेवणे आमचे काम आहे आणि ते आम्ही करूही. पण यामध्ये जुने केलेले व्हिडिओ टाकून, एक वातावरण समाजमाध्यमांवर निर्माण करणाऱ्यांनी आत्मभान गमावलेले आहे, त्यांनी आत्मनिरीक्षण केले पाहिजे," असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.(Ashish Shelar)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चिरागनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीला गती मिळाली असून त्यांच्या साहित्य, विचार आणि कार्याचा वारसा जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत. तसेच, आमच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत व चित्रनगरी (फिल्मसिटी) च्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य आणि प्रेरणादायी विचारांवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे," असेही मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.(Ashish Shelar)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....