मुंबई : (Maharashtra SIR Campaign) राज्यात राबवण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत ७ कोटी ७१ लाख मतदारांनी गणना प्रपत्र भरले असून २ कोटी ७ लाख मतदार यादीतून वगळले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
एसआयआर मोहिमेअंतर्गत दि. ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. राज्यातील एकूण ९.७८ कोटी मतदारांपैकी ७.७१ कोटी म्हणजेच ७८.८५ टक्के मतदारांनी गणना प्रपत्र भरून स्वाक्षरी करून दिली आहे. तर २.०७ कोटी म्हणजेच २१.१५ टक्के मतदार अर्ज ‘अगोचर’ श्रेणीत’ (Uncollectable EF) समाविष्ट करण्यात आले आहेत.(Maharashtra SIR Campaign)
या मतदारांमध्ये ७५.५२ लाख मतदार आढळून न आलेले किंवा गैरहजर, ७६.८० लाख मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले, ३४.८१ लाख मतदार मृत असल्याचे आढळले आहेत. तर, १७.६३ लाख मतदारांची अन्यत्र नोंदणी किंवा दुबार नोंदणी असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय २.२३ लाख मतदार विविध कारणांमुळे अर्ज सादर झाले नाहीत.(Maharashtra SIR Campaign)
या मतदारांच्या तात्पुरत्या याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या यादीतील कोणत्याही मतदाराबाबत राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) माहिती दिल्यास, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) त्याची पडताळणी करून गणना प्रपत्र भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(Maharashtra SIR Campaign)
प्रारूप मतदार यादी लवकरच
विशेष सखोल पुनरिक्षणानंतर लवकरच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून ही यादी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना सॉफ्ट आणि हार्ड कॉपी स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच ज्या नावांचा समावेश प्रारूप यादीत होऊ शकलेला नाही, अशा ‘अगोचर’ श्रेणीतील मतदारांची यादी संबंधित शासकीय कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर दिली जाईल.(Maharashtra SIR Campaign)
दावे-हरकतींसाठी महिनाभराची मुदत
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील एक महिन्याच्या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. या कालावधीत ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत आलेली नाहीत किंवा १ ऑक्टोबर रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे नवे तरुण मतदार विहित नमुन्यातील घोषणापत्र व कागदपत्रांसह नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून पडताळणी झाल्यानंतर पात्र अर्जांचा अंतिम मतदारयादरीत समावेश केला जाईल.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदारांना अर्ज ६ भरावा लागेल. मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करुन पुढील निर्णय घेतील असे आयोगाने कळवले आहे. पात्र मतदारांची पडताळणी केल्यानंतर त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.(Maharashtra SIR Campaign)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....