मुंबई : (Mukesh Gaurav Samiti) हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक स्वर्गीय मुकेश यांच्या स्मृतीचे जतन आणि त्यांच्या संगीत वारशाचा प्रचार करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात ‘स्वर्गीय गायक मुकेश गौरव समिती’ स्थापन करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार आहे.
दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी स्वर्गीय मुकेश यांची ५० वी पुण्यतिथी आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसह मराठी गीतांमधूनही त्यांनी भारतीय संस्कृती, संगीत परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या स्मृतीचे चिरंतन जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवोदित गायक-कलावंतांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासनाने विशेष गौरव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यात ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
समितीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा अध्यक्ष, अमय घोले आणि नील नितीन मुकेश सदस्य, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Mukesh Gaurav Samiti)
समितीचे काम काय?
या समितीमार्फत स्वर्गीय मुकेश यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याबरोबरच त्यांच्या संगीत वारशाचे जतन करण्यात येणार आहे. तसेच नवोदित गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार समितीच्या रचनेत किंवा कार्यकक्षेत सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदल करता येणार आहेत. (Mukesh Gaurav Samiti)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....