आंबेडकरी विचारांचा सखोल अभ्यास करण्याची संधी:ऐरोलीत पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

    19-Aug-2026   

Ambedkar Studies Course


नवी मुंबई,(Ambedkar Studies Course):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि समकालीन विचारांचा शैक्षणिक पद्धतीने अभ्यास करण्याची संधी आता नवी मुंबईत उपलब्ध झाली आहे. ऐरोली सेक्टर १५ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नवी मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी २० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार असून शनिवार आणि रविवारी वर्ग होणार आहेत. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून हा अभ्यासक्रम करता येणार आहे.(Ambedkar Studies Course)
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दोन सत्रांमध्ये अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी घेतलेल्या व्यक्तींना प्रवेशासाठी अर्ज करता येणार असून, यासाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही. पहिल्या सत्रात सामाजिक न्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक विचार, त्यांच्या विचारांचा समकालीन प्रश्नांशी असलेला संबंध, ‘जातिनिर्मूलन’, आर्थिक विचार आणि संशोधन पद्धती या विषयांचा अभ्यास केला जाणार आहे. दुसऱ्या सत्रात या विषयांचा पुढील स्तरावर अभ्यास करण्यासोबत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’, आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचा पुढील भाग तसेच क्षेत्रकार्य किंवा कार्यस्थळावरील प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.(Ambedkar Studies Course)
 
अभ्यासक्रमाचे वर्ग ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील जे. पी. नाईक भवन येथे होणार आहेत. अभ्यासक्रमाचे मूल्यांकन आणि प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडून देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक प्रा. वाल्मीक के. सरवदे यांच्या नियंत्रणाखाली अभ्यासक्रमाचे कामकाज सुरू आहे.(Ambedkar Studies Course)
 
प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असून इच्छुक उमेदवारांना muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाशी ९३७२७३४२४७, ७३५०४०८६८६ तसेच नवी मुंबई महानगरपालिकेशी ९७०२३०९०५४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. कोणत्याही शाखेतील पदवीधरांना प्रवेशाची संधी असल्याने सामाजिक शास्त्रांसह विविध क्षेत्रांतील पदवीधरांना आंबेडकरी विचारांचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.(Ambedkar Studies Course)







सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर