मराठवाड्याची सिंचन क्षमता वाढणार; जायकवाडी प्रकल्प टप्पा-२साठी ६ हजार ४७७ कोटींची तरतूद!

 
Jayakwadi Project Phase 2
 
मुंबई (Jayakwadi Project Phase 2) : मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रकल्पासाठी ६ हजार ४७७ कोटी ८८ लाख रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र या मिशनच्या दृष्टीने या निर्णयाला विशेष महत्व आहे.
 
या निर्णयामुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या उर्वरित कामांना वेग मिळणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२ अंतर्गत पैठण उजवा कालवा, माजलगाव धरण तसेच माजलगाव उजवा कालव्याशी संबंधित विविध कामे पूर्ण केली जाणार आहेत. (Jayakwadi Project Phase 2)
 
माजलगाव धरणाची साठवण क्षमता ४५४ दलघमी
 
पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार ४५४ दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचे माजलगाव धरण अस्तित्वात येणार आहे. या टप्प्यात माजलगाव (लोणी सावंगी) उपसा योजना, साळींबा ठिबक उपसा सिंचन योजना, शिरस मार्ग निम्नपातळी बंधारा, रोशनपुरी उच्चपातळी बंधारा आणि १४८ किलोमीटर लांबीचा माजलगाव उजवा कालवा यांचा समावेश आहे. (Jayakwadi Project Phase 2)
 
माजलगाव उजव्या कालव्यावर सहा मार्गस्थ जलाशय उभारण्याचे तसेच माजलगाव मासोळी प्रकल्पाची उंची वाढविण्याचे कामही प्रस्तावित आहे. जायकवाडी प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जायकवाडी धरण, २०८ किलोमीटर लांबीचा पैठण डावा कालवा, शाखा कालवे, वितरिका, उपवितरिका आणि लघुवितरिका यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे टप्पा-२ हा मराठवाड्यातील सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (Jayakwadi Project Phase 2)
 
पाच जिल्ह्यांतील १.३१ लाख हेक्टर क्षेत्राला लाभ
 
जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२मुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या पाच जिल्ह्यांतील १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. पैठण उजवा कालव्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील १,७३२ हेक्टर, अहिल्यानगरमधील १,६९० हेक्टर आणि बीडमधील ३८,२६० हेक्टर, असे एकूण ४१,६८२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
 
तर माजलगाव उजवा कालव्यामुळे बीडमधील २९,१०५ हेक्टर, परभणीमधील ४४,४०८ हेक्टर आणि नांदेडमधील ११,३३७ हेक्टर, असे एकूण ८४,८५० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय साळींबा ठिबक उपसा सिंचन योजनेद्वारे बीड जिल्ह्यातील आणखी ५,१२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या टप्पा-२मधील रखडलेल्या आणि प्रस्तावित कामांना आर्थिक बळ मिळून मराठवाड्यातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. (Jayakwadi Project Phase 2)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर