श्री सिद्धिविनायक मंदिर विकासाला ख्रिश्चन शाळेचा विरोध?

पालकांची फसवणूक करून सह्या लाटण्याचा प्रयत्न

    18-Aug-2026   

Siddhivinayak Temple Development
 
 मुंबई : (Siddhivinayak Temple Development) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या सुशोभीकरण आणि विकास प्रकल्पाला गती दिली जात असतानाच, एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुकर दर्शनासाठी नियोजित असलेल्या मंदिर प्रवेशद्वाराच्या विकासकामांना परिसरातील कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलने तीव्र विरोध दर्शवला आहे. इतकेच नव्हे, तर या विरोधासाठी शाळा प्रशासनाने पालकांची थेट दिशाभूल करत त्यांच्याकडून सह्या लाटल्याचा गंभीर प्रकार सोमवार, १७ ऑगस्ट रोजी उघडकीस आला.
 
श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओनंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. या व्हिडिओनंतर ‘दै. मुंबई तरुण भारत’ने थेट शाळेतील हिंदू विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला असता, शाळा प्रशासनाचा एक धक्कादायक आणि संशयास्पद कारनामा चव्हाट्यावर आला.(Siddhivinayak Temple Development)
 
सोमवारी शाळेचा 'ओपन डे' असल्याने पालक मोठ्या संख्येने शाळेत उपस्थित होते. हल्ली विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर तपासल्यानंतर ते पालकांना दाखवले जातात. पालकांनी येऊन त्याची दखल घेतली म्हणून त्यांचे नाव आणि नावापुढे स्वाक्षरी घेतली जाते. इथेही तोच प्रकार सुरु होता. मात्र, हजेरीच्या कागदाखाली आणखी एक छुपा कागद ठेवून शिक्षकांनी पालकांकडून त्यावर सह्या घेण्याचा सपाटा लावला.(Siddhivinayak Temple Development)
 
हा छुपा कागद नेमका कशासाठी आहे? याची कोणतीही पूर्वकल्पना पालकांना देण्यात आली नव्हती. शिक्षकांनी सांगितल्यामुळे काही पालकांनी अजाणतेपणी सह्या केल्या. परंतु, काही सजग हिंदू पालकांनी जेव्हा या सह्यांबद्दल विचारणा केली, तेव्हा उपस्थित शिक्षकांनी उत्तर देणे टाळून उडवाउडवीची उत्तरे दिली. पालकांनी खडसावून जाब विचारल्यानंतर एका शिक्षिकेने तोंडी कबुली दिली की, "शाळेच्या परिसरात होणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या नव्या प्रवेशद्वाराला विरोध दर्शवण्यासाठी या सह्या गोळा केल्या जात आहेत."(Siddhivinayak Temple Development)
 
आपल्या नकळत शाळा प्रशासन इतका गंभीर आणि हिंदू आस्थेशी संबंधित कट रचत असल्याचे लक्षात येताच पालकांचा संताप अनावर झाला. संतप्त पालकांनी या फसवणुकीला कडाडून विरोध केला आणि तात्काळ ही बाब समाधान सरवणकर तसेच 'दै. मुंबई तरुण भारत'च्या निदर्शनास आणून दिली. भाविकांच्या सुविधेसाठी होणाऱ्या विकासकामांना अशा प्रकारे चोरट्या मार्गाने आणि पालकांची फसवणूक करून विरोध करणाऱ्या कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूल प्रशासनाविरुद्ध आता पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.(Siddhivinayak Temple Development)
 
हिंदू विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक; पालकांचा गंभीर आरोप
 
'दैनिक मुंबई तरुण भारत'ने विरोध करणाऱ्या काही पालकांशी संवाद साधला असता एक गंभीर बाब समोर आली. या ठिकाणी आजही हिंदू आणि ख्रिश्चन विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव केला जातो आणि हिंदू विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. सह्यांच्या संदर्भात पालकांनी विचारणा केली असता, शिक्षकांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मंदिराच्या प्रवेशद्वाराला शाळेचा विरोध असला, तरी शाळेत येणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांच्या पालकांचा त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे पालकांना अंधारात ठेवून अशा प्रकारे सह्या घेणे चुकीचे आहे. शाळा व्यवस्थापन आजही मुलांमध्ये हिंदू-ख्रिश्चन असा भेद करत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.(Siddhivinayak Temple Development)
 
शाळेच्या वेबसाईट वरील फोन बंद!
 
दै. मुंबई तरुण भारतने शाळेच्या मुख्याध्यापिका आशा अल्मेडिया यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. कॉन्व्हेंट गर्ल्स हायस्कूलच्या वेबसाईटवर असलेल्या फोन नंबरवर सुद्धा संपर्क साधला, परंतु नंबर बंद आहे. तसेच शाळेत शिकवणाऱ्या काही शिक्षकांशी संवाद साधला मात्र त्यांना याविषयाबाबत कोणती माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच कार्यालयाच्या संपर्काबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, योग्य प्रतिसाद मिळाला नाही.(Siddhivinayak Temple Development)
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर