पाच जिल्ह्यांचा प्रवासी

    17-Aug-2026   
Maharashtra Tiger Journey
 
 
दोन वर्षांत पाच जिल्ह्यांमधून शेकडो किमीचा प्रवास करणार्‍या धाराशिवच्या नर वाघाची कहाणी केवळ एका भटक्या वाघाची नाही; तर बदलत्या अधिवासात वाघांच्या अनुकूलन क्षमतेचा आणि महाराष्ट्रातील तुटक जंगलांमधील वन्यजीव भ्रमणमार्गांचा महत्त्वाचा दाखला आहे. त्याविषयी आढावा घेणारा हा लेख...
 
डिसेंबर २०२४. धाराशिव जिल्ह्यातील येडशी वनपरिक्षेत्रात अचानक एका नर वाघाचे दर्शन झाले आणि वनविभागाची यंत्रणा सतर्क झाली. या वाघाचे छायाचित्र कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपण्यात आले. ओळख पटविण्यासाठी हे छायाचित्र ‘भारतीय वन्यजीव संस्थे’कडे (WII) पाठविण्यात आले. त्यानंतर समोर आलेली माहिती विशेष होती. हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात २०२२ मध्ये जन्मलेला असल्याचे स्पष्ट झाले.
 
टिपेश्वरमधील T22 या सांकेतिक क्रमांकाच्या वाघिणीच्या पोटी जन्मलेला हा नर वाघ साधारण दोन वर्षांचा झाल्यानंतर आईपासून विलग झाला. प्रौढ नर वाघांसाठी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आईच्या अधिवासात कायम राहण्याऐवजी स्वतःची हद्द निर्माण करण्यासाठी नर वाघ मोठ्या अंतराचा प्रवास करतात. मात्र, या वाघाचा प्रवास विशेष ठरला. यवतमाळपासून थेट धाराशिवपर्यंतचा सुमारे ५०० किमीचा प्रवास त्याने केला.
 
धाराशिवमध्ये दाखल झाल्यानंतर डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या काळात बार्शी, येडशी आणि तुळजापूर परिसरात त्याचा वावर आढळून आला. या काळात त्याच्या हालचालींवर वनविभागाने लक्ष ठेवले. मानव-वाघ संघर्षाची शक्यता आणि मानवी वस्त्यांच्या जवळील त्याचा वावर लक्षात घेऊन त्याला पकडून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलविण्याची मोहीम आखण्यात आली. मात्र, हा सावध आणि अत्यंत चपळ नर वाघ वनविभागाच्या पिंजर्‍यात अडकला नाही. यानंतर त्याच्या हालचाली आणखी रोचक झाल्या.
 
येडशीपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा परिसरात त्याची उपस्थिती नोंदविण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा धाराशिवच्या दिशेने परतला. पुढे त्याने जामखेडपर्यंत मजल मारली. सप्टेंबर २०२५ पर्यंत तुळजापूर परिसरात त्याचे ‘मॉनिटरिंग’ करण्यात आले. त्यानंतर काही काळ त्याच्या हालचालींची ठोस माहिती मिळाली नाही. आता पुन्हा त्याच्या अस्तित्वाची खूण समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवळाली परिसरात. येथे वाघाच्या पायाचे ठसे आढळले असून, एका पाळीव जनावराची शिकारही त्याने केल्याचे समोर आले आहे. म्हणजेच, गेल्या दोन वर्षांत हा वाघ यवतमाळ, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांच्या वनक्षेत्रात अथवा सीमावर्ती भागांतून फिरला असून आता बीडमध्ये पोहोचला आहे.
 
जंगल कमी, पण वाघाची वाट मोठी
 
या वाघाच्या प्रवासाकडे केवळ ‘भटकंती’ म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. महाराष्ट्राच्या मध्य भागातील जंगलांचे स्वरूप समजून घेण्यासाठी हा एक महत्त्वाचा ‘केस स्टडी’ ठरू शकतो. विदर्भातील सलग जंगलांमधून बाहेर पडलेला वाघ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने तुटक, लहान वनक्षेत्रांमध्ये टिकून राहात आहे. वाघ हा प्रामुख्याने मोठ्या जंगलांशी जोडला जात असला, तरी त्याची हालचाल केवळ दाट जंगलापुरती मर्यादित नसते. उपलब्ध शिकार, पाण्याचे स्रोत, मानवी वस्तीपासून सुरक्षित अंतर आणि आडोसा देणारी झाडी किंवा गवताळ अधिवास उपलब्ध असल्यास वाघ तुटक अधिवासातूनही प्रवास करू शकतो.
 
विशेषतः गवताळ प्रदेश, काटेरी झुडपी वनक्षेत्र, नदीकाठची झाडी, नाले, ओढे आणि शेतीलगतची नैसर्गिक वनस्पती हे अशा प्रवासी वाघांसाठी तात्पुरते ‘स्टेपिंग स्टोन’ अधिवास ठरू शकतात. दिवसाच्या वेळी झाडी किंवा दाट गवतामध्ये लपून राहणे आणि रात्रीच्या वेळी मोठ्या अंतराचा प्रवास करणे, ही वाघांच्या हालचालींची एक महत्त्वाची रणनीती आहे. यामुळेच वाघाला दिसणारे प्रत्येक ठिकाण त्याचा कायमस्वरूपी अधिवास असेलच असे नाही. एखाद्या परिसरात तो काही दिवस किंवा काही आठवडे राहू शकतो आणि शिकार, पाण्याची उपलब्धता किंवा इतर नर वाघांची हद्द यांनुसार पुढे सरकू शकतो.
 
गवताळ प्रदेशाची भूमिका
 
या वाघाच्या कहाणीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गवताळ आणि मोकळ्या अधिवासांचे संवर्धन. गवताळ प्रदेशांना अनेकदा ‘जंगल नसलेली जमीन’ म्हणून पाहिले जाते; मात्र जैवविविधतेच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे अधिवास आहेत. या प्रदेशांमध्ये काळवीट, चिंकारा, रानडुक्कर, ससे, नीलगाय यांसारख्या प्राण्यांची उपलब्धता असल्यास मोठ्या मांसाहारी प्राण्यांसाठी ते शिकार क्षेत्र ठरू शकतात. गवताळ प्रदेशाला जोडणारे झुडपी पट्टे, नदी-नाले आणि लहान वनक्षेत्रे उपलब्ध असतील, तर ते मोठ्या प्राण्यांच्या स्थलांतरासाठी नैसर्गिक मार्ग तयार करतात.
 
आपल्या समोरील प्रश्न
 
धाराशिवपासून आष्टी पर्यंतच्या या वाघाच्या प्रवासातून त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आपण वन्यजीवांसाठी असलेल्या या नैसर्गिक जोडण्या कितपत जपून ठेवत आहोत? रस्ते, रेल्वे, सिंचन प्रकल्प, वाढती शेती, मानवी वस्ती आणि इतर पायाभूत सुविधा यांमुळे अधिवासाचे तुकडीकरण वाढत आहे. अशा परिस्थितीत वाघांसारख्या मोठ्या प्राण्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
 
प्रवासी ‘वॉकर’
 
या वाघाची गोष्ट ऐकताना महाराष्ट्रातील वन्यजीव इतिहासातील ‘वॉकर’ची आठवण होणे स्वाभाविक आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातून निघालेल्या T1-C1 या नर वाघाला वनविभाग आणि WII संशोधन पथकाने ‘रेडिओ कॉलर’ लावला होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्र आणि तेलंगणातील जंगल, शेती, गावे आणि विविध भूभागातून तब्बल तीन हजार किमीपेक्षा अधिक प्रवास केला. या प्रदीर्घ प्रवासामुळे त्याला ‘Walker’ हे नाव मिळाले. त्याचा प्रवास टिपेश्वरपासून पैनगंगा परिसर, तेलंगणातील भाग आणि पुढे महाराष्ट्रातील ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत पोहोचला.
 
विशेष म्हणजे, वॉकरने मानवी वस्तीने व्यापलेल्या भागामधूनही मोठ्या प्रमाणावर संघर्ष टाळत मार्गक्रमण केले. त्याच्या हालचालींच्या अभ्यासातून वाघांना जोडणार्‍या भ्रमणमार्गांचेचे महत्त्व अधोरेखित झाले. एखाद्या जंगलाचा तुकडा स्वतंत्र बेटाप्रमाणे राहिला आणि त्याचा इतर जंगलांशी संपर्क तुटला, तर भविष्यात तेथे वाघांची संख्या वाढली, तरी त्यांच्यासाठी नवीन क्षेत्र उपलब्ध होणे कठीण ठरते.
 
पुढचा प्रवास कुठे?
 
या वाघाने आतापर्यंत दाखवून दिले आहे की, त्याची भ्रमणक्षमता मोठी आहे. एका ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला, तरी तो पुढे सरकला. एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात, पुन्हा मागे आणि नंतर नव्या दिशेने त्याच्या हालचालींमधून त्याची विलक्षण अनुकूलन क्षमता दिसून येते. मात्र, या प्रवासासोबत धोकेही वाढतात. पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते.
 
त्याचवेळी वाघाला पकडणे किंवा दुसर्‍या ठिकाणी हलविणे, हा प्रत्येक वेळी दीर्घकालीन उपाय असेलच, असे नाही. त्यासाठी वाघाच्या हालचाली, शिकार उपलब्धता, अधिवासाची गुणवत्ता आणि मानव-वाघ संघर्षाची तीव्रता यांचा वैज्ञानिक अभ्यास आवश्यक आहे.आज बीडच्या आष्टी तालुक्यात त्याच्या पावलांचे ठसे उमटले आहेत. उद्या तो पुन्हा कोणत्या जिल्ह्याच्या दिशेने वळेल, कोणत्या गवताळ पट्ट्यातून प्रवास करेल आणि स्वतःची हद्द कुठे निश्चित करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर