नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला; नाशिकमध्ये गिरीष महाजन तर, रायगडमध्ये भरत गोगावलेंची नियुक्ती

    17-Aug-2026
Nashik Raigad Guardian Minister
 
मुंबई : (Nashik Raigad Guardian Minister) गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीष महाजन तर, रायगडच्या पालकमंत्रपदी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी, सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केला होता. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील नियुक्त्यांवर स्थगिती देण्यात आली होती. नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर, रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरु होती. अखेर, आता हा प्रश्न सुटला असून नाशिकमध्ये भाजप तर, रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला देण्यात आले. (Nashik Raigad Guardian Minister)
 
स्वातंत्र्यदिनी दोन्ही नेत्यांच्या हस्ते ध्वजारोहण
 
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन तर, रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी या दोन्ही नेत्यांची नावे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात होते. आता त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले आहे. (Nashik Raigad Guardian Minister)
 
 




संबंधित मजकूर