गोसावीवाडीत गोळीबाराचा थरार; जामिनावर बाहेर आलेल्या सुमित पगारेचा उपचारादरम्यान मृत्यू, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १० ताब्यात

    17-Aug-2026
Nashik Gosaviwadi Firing
नाशिक : (Nashik Gosaviwadi Firing) नाशिकरोडमधील गोसावीवाडी चौफुलीवर रविवारी, दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या गोळीबाराने परिसर हादरला. पानटपरीजवळ उभ्या असलेल्या सुमित अरुण पगारे (३२) याच्यावर अज्ञात हल्लेखोराने जवळून दोन गोळ्या झाडल्या. पोटाच्या भागात गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेल्या पगारेचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १० जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित चार संशयितांचा शोध सुरू आहे.
 
सायंकाळी सव्वासातच्या सुमारास गोळीबार
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित पगारे हा गोसावीवाडी चौफुलीवरील पानटपरीजवळ उभा असताना हल्लेखोराने त्याला लक्ष्य केले. अवघ्या काही क्षणांत दोन गोळ्या झाडून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या पगारे याला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Nashik Gosaviwadi Firing)
 
१४ जणांविरुद्ध गुन्हा; १० जण पोलिसांच्या ताब्यात
 
या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अर्जुन पीवाल, शिवा पीवाल, अक्षर गोसावी, पराग कुलकर्णी, मुन्ना गांगुडे, राजविर गांगुडे, राजीद शेख, शाहिद शेख, साद पठाण, निशांत भारती, आयुष भारती, राहुल सोनवणे, आशीष पीवाल आणि अमोल वाघ अशा एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यापैकी १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित चार जणांचा शोध सुरू आहे. या सर्वांची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय आहे, तसेच गोळीबारामागे कोणाचा प्रत्यक्ष सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. (Nashik Gosaviwadi Firing)
 
सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक तपास
 
घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड आणि उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच संशयितांच्या हालचालींचा माग काढला जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर कोणत्या दिशेने पसार झाला, त्याला मदत करणारे आणखी कोणी होते का, याचाही तपास सुरू आहे. (Nashik Gosaviwadi Firing)
 
एमडी प्रकरणातील पार्श्वभूमीमुळे तपासाला वेगळे वळण
 
मृत सुमित पगारेचे नाव यापूर्वी नाशिकमधील सामनगाव एमडी ड्रग्ज प्रकरणात संशयित म्हणून समोर आले होते. २०२३ मध्ये या प्रकरणाच्या तपासादरम्यान सनी पगारे, सुमित पगारे यांच्यासह अन्य संशयितांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्याचाही उल्लेख आहे. सुमित पगारे नुकताच जामिनावर बाहेर आला होता. (Nashik Gosaviwadi Firing)
 
त्यामुळे सद्य गोळीबाराचा संबंध जुन्या गुन्हेगारी वैमनस्याशी, आर्थिक व्यवहाराशी किंवा अन्य कोणत्या वादाशी आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. (Nashik Gosaviwadi Firing)
 
कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
 
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असताना, गजबजलेल्या गोसावीवाडी चौफुलीवर झालेला गोळीबार आणि त्यानंतर झालेला मृत्यू यामुळे नाशिकरोडमधील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Nashik Gosaviwadi Firing)
 
दरम्यान, या प्रकरणातील १० संशयित ताब्यात आल्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असून, उर्वरित चार संशयितांना पकडल्यानंतर गोळीबारामागील संपूर्ण साखळी आणि हल्ल्याचा नेमका सूत्रधार समोर येण्याची शक्यता आहे. (Nashik Gosaviwadi Firing)
 
 




संबंधित मजकूर