विधानसभेत मांडलेल्या मागणीला अखेर यश; दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांना FDA चा दणका? वाचा सविस्तर

४ जुलै २०२५ रोजी विधानसभेत विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केला होता प्रश्न; वर्षभराच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कारवाई

FDA Notice To Actors
 
मुंबई : (FDA Notice To Actors) इलायची, सौफ अथवा तत्सम उत्पादनांच्या नावाखाली जाहिराती करून प्रत्यक्षात फ्लेवर्ड सुपारी, तंबाखू, पान मसाला व गुटख्यासारख्या उत्पादनांच्या ब्रँडचा अप्रत्यक्ष प्रचार करणाऱ्या जाहिरातींबाबत मी ४ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत ठामपणे आवाज उठवला होता. अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अभिनेते व सेलिब्रिटींवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी शासनाकडे केली होती.
 
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; कारणे दाखवा नोटीस
 
या मागणीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा जाहिरातींमध्ये सहभागी असलेल्या अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कारवाई केवळ एखाद्या जाहिरातीपुरती मर्यादित बाब नसून सार्वजनिक आरोग्य आणि विशेषतः तरुण पिढीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया आमदार पाचपुते यांनी दिली आहे. (FDA Notice To Actors)
 
आरोग्यास घातक उत्पादनांबाबत युवकांमध्ये, स्वीकारार्हता निर्माण होण्याचा धोका
 
एका बाजूला तंबाखू, गुटखा व आरोग्यास घातक उत्पादनांवर निर्बंध असताना, त्याच ब्रँडच्या नावाने इलायची, सौफ किंवा अन्य उत्पादनांची जाहिरात करून ब्रँडला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते. लोकप्रिय अभिनेते आणि सेलिब्रिटींचा चेहरा वापरल्यामुळे अशा ब्रँडबाबत समाजात, विशेषतः युवकांमध्ये, आकर्षण आणि स्वीकारार्हता निर्माण होण्याचा धोका असतो. (FDA Notice To Actors)
 
सेलिब्रिटींचीही सामाजिक जबाबदारी
 
“जाहिरात इलायचीची किंवा सौफची असली, तरी त्यामागे जर तंबाखू, पान मसाला किंवा गुटख्याच्या ब्रँडची प्रसिद्धी होत असेल, तर केवळ उत्पादनाचे नाव बदलून सामाजिक जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही.
 
मोठ्या सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा प्रभाव लाखो तरुणांवर पडतो. त्यामुळे अशा जाहिराती स्वीकारताना त्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, हीच भूमिका मी विधानसभेत मांडली होती. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे, असेही विक्रम पाचपुते म्हणाले. (FDA Notice To Actors)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर