नवी दिल्ली: (Rahul Gandhi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात संसदेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लोकसभेत असंसदीय भाषा वापरल्याचा आणि गंभीर आरोप केल्याचा ठपका ठेवत लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना विशेषाधिकारभंगाची नोटीस बजावली आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांना २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले स्पष्टीकरण किंवा उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Rahul Gandhi)
लोकसभेतील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्याविरोधात असंसदीय आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा तसेच गंभीर आरोप केल्याचा दावा भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि संजय जायस्वाल यांनी केला होता. (Rahul Gandhi)
दोन्ही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे विशेषाधिकारभंगाच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांनी ३० जुलै रोजी दिलेल्या तक्रारीत राहुल गांधी यांनी लोकसभा नियम ३५३ अंतर्गत आवश्यक पूर्वसूचना न देता गृहमंत्र्यांविरोधात गंभीर आरोप केल्याचा दावा केला. तसेच त्यांच्या वक्तव्यामुळे संसदीय विशेषाधिकाराचा भंग आणि सभागृहाचा अवमान झाल्याचेही त्यांनी म्हटले. संजय जायस्वाल यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्याला असंसदीय ठरवत योग्य कारवाईची मागणी केली होती. लोकसभा सचिवालयाने दोन्ही तक्रारींच्या प्रती राहुल गांधी यांच्याकडे पाठवून त्यांचे म्हणणे मागवले आहे. राहुल गांधींचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्याचा विचार करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. (Rahul Gandhi)