संजय राऊतांसोबत आदित्य ठाकरेही उभे राहण्यास तयार नाहीत - नवनाथ बन

    15-Aug-2026
Navnath Ban statement
 
मुंबई : (Navnath Ban statement) "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ पासून देशातील तरुणाईचे नेतृत्व समर्थपणे केले आहे. संपूर्ण तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे. संजय राऊतांसोबत आदित्य ठाकरेही उभे राहण्यास तयार नाहीत आणि राऊत बदलाची आणि तरुणाईची भाषा करत आहेत. प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांच्या बळावर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी या देशाचे नेतृत्व करतील आणि तुम्हाला पुन्हा एकदा घरीच बसावे लागेल." अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवार दि.१५ रोजी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली.
 
"स्वातंत्र्यलढ्यात देशभक्त होते आणि काँग्रेसचे योगदानही होते. मात्र, तेव्हाची काँग्रेस आणि आताची काँग्रेस यात जमीनअस्मानाचा फरक आहे. स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेस देशभक्तांची काँग्रेस होती तर आताची काँग्रेस तुमच्यासारख्या देशद्रोहींच्या आधारावर चालते. कारण तुम्हाला भारतीय स्वातंत्र्याचा अभिमान नाही. १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा झाल्याचा तुम्हाला अधिक आनंद आहे. या देशाच्या फाळणीसाठी कोण जबाबदार होते, हेही जनतेला माहिती आहे. आताची काँग्रेस ही भ्रष्टाचार करणारी आणि देशाला लुटणारी असल्यानेच जनतेने काँग्रेसला घरी बसवले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम आणि स्वच्छ नेतृत्वाखाली देश पुन्हा एकदा उभा राहिला आहे. संजय राऊत, स्वातंत्र्यलढ्यात तुमचं योगदान काय होते, हे एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग मोदीजींवर टीका करा." असेही बन यांनी सुनावले. (Navnath Ban statement)
 
"संजय राऊत तुम्ही आणि तुमच्या मालकांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली आहे. हिंदुत्वाच्या नावावर भूमिका मांडत तुम्ही काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झाल्याने खोटे बोलण्याचा विक्रम हा तुमच्या आणि तुमच्या मालकाच्या नावावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे आणि देशातील १४० कोटी जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. मात्र, महाराष्ट्र आणि देशातील जनतेकडून तुम्हाला केवळ टीका आणि नाराजीच मिळत आहे."अशा शब्दात बन यांनी राऊत यांना फटकारले. (Navnath Ban statement)
 
" महाराष्ट्रातील जनतेला तुमची लायकी आणि पात्रता माहिती आहे. त्यामुळे ना उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले, ना महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मुख्यमंत्री करणार. राहुल गांधी यांची महत्त्वाकांक्षा देशाचे पंतप्रधान होण्याची आहे. मात्र देशातील जनतेला त्यांची लायकी माहिती असल्याने जनतेने अनेक निवडणुकांमध्ये राहुल गांधींना नाकारले. तुमची महत्त्वाकांक्षा उबाठा गट ताब्यात घेण्याची आहे. पण महाराष्ट्रातील जनतेने तुमची लायकी ओळखल्याने तुम्हाला घरी बसण्याचे काम केले. त्यामुळे आधी स्वतःची लायकी आणि पात्रता ओळखा." असेही बन यांनी राऊत यांना सुनावले.(Navnath Ban statement)
 
 




संबंधित मजकूर