मुंबई : (Maharashtra Hawkers Union) गणेशोत्सव, दहीहंडी आणि नवरात्रोत्सवासह आगामी हिंदू सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लाखो पथविक्रेत्यांच्या उपजीविका, व्यवसाय आणि हक्कांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र हॉकर्स संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांनी महापालिकेकडे ठोस मागण्या मांडल्या आहेत. या संदर्भात संघाच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर रितू ताई तावडे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले.(Maharashtra Hawkers Union)
सणासुदीच्या काळात नागरिकांना पूजासाहित्य, सजावटीच्या वस्तू तसेच इतर आवश्यक साहित्य सहज उपलब्ध करून देण्यात पथविक्रेत्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र, या काळात प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची भूमिका संघाने मांडली. त्यामुळे अटी व शर्तींच्या अधीन राहून पथविक्रेत्यांना सन्मानाने व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, सणासुदीच्या काळात त्यांच्या व्यवसायात कोणताही अडथळा आणू नये आणि प्रलंबित मागण्यांवर मानवी व सकारात्मक दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली.(Maharashtra Hawkers Union)
यावेळी महापौर रितू ताई तावडे यांनी पथविक्रेत्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेत सणासुदीपूर्वी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार महाराष्ट्र हॉकर्स संघाने व्यक्त केला. (Maharashtra Hawkers Union)
या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघाचे रवींद्र दाभोलकर, महाराष्ट्र हॉकर्स संघाचे कार्याध्यक्ष नितीन बेळणेकर, सहसचिव शिवाजी सुळे, मुंबई सरचिटणीस व टाउन वेंडिंग कमिटी सदस्य प्रदीप फुले, स्वीकृत नगरसेवक प्रतीक कर्पे, सुभाष बचले, वंदना चौगुले, राधा पटेल, महेश कानडे, देवानंद थोरात तसेच भारतीय मजदूर संघ आणि महाराष्ट्र हॉकर्स संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (Maharashtra Hawkers Union)