मुंबई : (Maharashtra Growth Engine Of India) विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र सर्वात मोठा वाटेकरी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या बारा वर्षांत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यापर्यंत मजल मारली असून, २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात देशाला यश आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. विकसित भारत म्हणजे केवळ विकसित अर्थव्यवस्था नव्हे, तर दिनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Growth Engine Of India)
महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’
देशाच्या विकासात महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांच्या आधारे राज्याचा विकास सुरू आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत राज्याचा आर्थिक विकासदर सुमारे ८.८ टक्के राहिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्रत्येक जिल्हा विकासाचे इंजिन बनला पाहिजे, या उद्देशाने शासन काम करत असून सुमारे २० जिल्ह्यांनी आपले विकासाचे लक्ष्य पूर्ण केले आहे. गडचिरोली, पालघर, नंदुरबार यांसारख्या दुर्गम भागांपर्यंत विकास पोहोचविण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.(Maharashtra Growth Engine Of India)
५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटींची कर्जमाफी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणण्यात आली असून, ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे उद्दिष्ट असून, सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. पुढील वर्षभरात १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट कायमचे दूर करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.(Maharashtra Growth Engine Of India)
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र दर्जा
महिलांना शेतकरी म्हणून दर्जा देण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला असून, देशात असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महिलांसह समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी लक्षित योजना राबवून सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.(Maharashtra Growth Engine Of India)
युवांसाठी शिक्षण, रोजगाराच्या संधी
राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्यु-सिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा उंचावण्याबरोबरच आधुनिक आणि ‘कटिंग एज’ शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या सर्वाधिक संधी निर्माण करून युवाशक्तीला त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.(Maharashtra Growth Engine Of India)
अधिकारांसोबत कर्तव्यांचीही जाणीव ठेवा
संविधानाने नागरिकांना अधिकार दिले आहेत; त्याचबरोबर कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने आपल्या कर्तव्यांचे भान ठेवण्याचा संकल्प करावा आणि देशाचा तिरंगा सदैव उंच राहील यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.(Maharashtra Growth Engine Of India)