गुंतवणुकीची माध्यमे काळाच्या ओघात बदलली. गेल्या दशकभरात सामान्य माणूस भांडवली बाजाराकडे वळला. परंपरांगत गुंतवणूक सोडून त्याने भांडवली बाजाराचा नवीन मार्ग स्वीकारला. अर्थात, यात जोखीम होतीच. मात्र, संपत्तीनिर्माणाच्या या प्रवाहात जोखीम घेण्याच्या सामान्य माणसाच्या वृत्तीमध्येही बदल दिसला. या बदलाबरोबर गुंतवणुकीची साधनेहे विकसित होत गेली, नवीन निर्देशांक निर्माण झाले. यातील ‘निफ्टी’ या राष्ट्रीय शेअर बाजारातील ‘कॅपिटल मार्केट’ निर्देशांकाचा आढावा घेणारा लेख...
भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या वाढीचा वेध घेण्यासाठी, ‘निफ्टी कॅपिटल मार्केट निर्देशांक’ हा महत्त्वाचा मानदंड आहे. भांडवली बाजार, म्युच्युअल फंड डिपॉझटरी, एसचेंज, वेल्थ मॅनेजमेंट आणि भांडवली बाजाराशी इतर वित्तीय सेवा कंपन्यांची कामगिरी, याच निर्देशांकातून प्रतिबिंब होते. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीचा विचार करणार्या गुंतवणूकदारांना या निर्देशांकाची माहिती असणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय शेअर बाजार अथार्र्त ‘एनएसई’ने तयार केलेला ‘निफ्टी कॅपिटल मार्केट निर्देशांक’, हा भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करणारा निर्देशांक आहे. या निर्देशांकामध्ये एकूण २० प्रमुख कंपन्यांची निवड केली जाते. मात्र, या निवडीसाठी, संबंधित कंपनी ‘निफ्टी ५००’ निर्देशांकातील असणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्येक कंपनीचे उपलब्ध बाजारमूल्यांकन आणि त्याची सहा महिन्यांची सरासरीही विचारात घेतली जाते. त्यामुळे या निर्देशांकातील कंपन्या तुलनेने मोठ्या, स्थिर आणि क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जातात.
या निर्देशांकाची सुरुवात दि. ९ सप्टेंबर २०२४ रोजी झाली. प्रारंभी १७ कंपन्यांचाच यात समावेश करण्यात आला. निर्देशांकाचे पायाभूत वर्ष दि. १ एप्रिल २०१९ असून, त्याचे प्रारंभिक मूल्य एक हजार निश्चित करण्यात आले. या निर्देशांकातील कंपनींचा आढावा दर सहा महिन्यांनी घेतला जात असून, आवश्यकतेनुसार त्यात बदलही केले जातात.
हा निर्देशांक दि. १० जुलै रोजी बाजार बंद होताना, ५ हजार, ५४० अंशांवर होता. गेल्या एका वर्षात त्याने ५ हजार, ६९७ अंशांच्या उच्चांकापर्यंत मजल मारली, तर ४ हजार, ८७ अंश या नीचांकी पातळीपर्यंत घसरणही अनुभवली. या कालावधीत निर्देशांकाने सुमारे २१ टक्के भांडवलवृद्धीही दिली. त्यामुळे भांडवली बाजाराशी संबंधित कंपन्यांच्या वाढीचा, हा एक महत्त्वाचा निर्देशांक ठरला आहे. येत्या काही महिन्यांत या निर्देशांकात काही बदल होण्याची शयता आहे. ‘एसबीआय फंड मॅनेजमेंट’ या कंपनीचा या निर्देशांकात समावेश होऊ शकतो. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या शेअरचाही या निर्देशांकात समावेश अपेक्षित आहे. नियमानुसार ‘बीएसई’चा शेअर ‘एनएसई’वर लिस्ट आहेच. तसेच ‘एनएसई’चा शेअर ‘बीएसई’वरही निर्देशांकासाठी पात्र ठरू शकतो. या निर्देशांकातील बहुतांश कंपन्या वेगाने वाढणार्या व्यवसायांमध्येच कार्यरत आहेत. शेअर बाजारातील व्यवहार, म्युच्युअल फंड गुंतवणूक, डी-मॅट खाती, व्यवहारांची नोंदणी आणि सेटलमेंट या सर्व प्रक्रिया सातत्याने वाढत असल्याने, या कंपन्यांचा व्यवसायही सातत्याने विस्तारत आहे.
या कंपन्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचा भांडवली खर्च तुलनेने कमी असतो. दुसरीकडे ‘सीडीएसएल’ आणि ’कॅम्प’ यांसारख्या कंपन्यांना, त्यांच्या क्षेत्रात मजबूत स्पर्धात्मक किंवा मक्तेदारीसदृश स्थान लाभले आहे. त्यामुळे दीर्घकालीन वाढीची क्षमता त्यांच्यात दिसते. भारताची लोकसंख्या लक्षात घेतल्यास, शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करणार्यांचे प्रमाण अजूनही तुलनेने कमी आहे. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात वाढीची मोठीच संधी उपलब्ध आहे. प्रत्येक कंपनीच्या शेअरचा स्वतंत्र अभ्यास करून गुंतवणूक करण्याऐवजी, या निर्देशांकावर आधारित इंडेस फंडांमध्ये गुंतवणूक करणे, हा अनेक गुंतवणूकदारांसाठी सोपा आणि परिणामकारक पर्याय ठरू शकतो. याचे उदाहरण म्हणजे, ‘टाटा निफ्टी कॅपिटल मार्केट इंडेस फंड’ या योजनेची सुरुवात दि. २४ ऑटोबर २०२४ रोजी झाली. दि. ३० जून २०२६ रोजी या योजनेत सुमारे ९०० कोटी रुपयांची मालमत्ता व्यवस्थापनाखाली होती. योजना तुलनेने नवी असल्याने, तिच्या दीर्घकालीन कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी आणखी काही कालावधी आवश्यक असला, तरी सुरुवातीच्या काळात तिने समाधानकारक भांडवलवृद्धी दिली आहे. कोणत्याही निर्देशांकाचा उद्देश विशिष्ट क्षेत्राची दिशा दाखविणे हाच असतो. त्यामुळे प्रथम ‘निफ्टी कॅपिटल’ निर्देशांकाची रचना आणि त्यातील कंपन्यांची वैशिष्ट्ये समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित कंपनीचा सखोल अभ्यास करून, थेट शेअरमध्ये किंवा निर्देशांकावर आधारित इंडेस फंडांमध्ये गुंतवणुकीचा विचार करणे योग्य ठरेल. मात्र, कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःच्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेचा आणि कालावधीचा विचार करून, पात्र गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. निर्देशांक हा गुंतवणुकीची दिशा दाखवितो, अंतिम निर्णय मात्र गुंतवणूकदाराने विवेकानेच घ्यायचा असतो.
म्युच्युअल फंडाचा : डायरेट की रेग्युलर प्लॅन
गेल्या काही वर्षांत देशातील ‘फिनटेक’ कंपन्यांनी आणि मोबाईल अॅपनी, सर्व गुंतवणूकदारांना मोबाईलच्या एका क्लिकवर म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. शून्य कमिशन, थेट गुंतवणूक आणि ‘कागदपत्रांशिवाय दोन मिनिटांत एसआयपी सुरू करा’ अशा घोषणांमुळे, कोट्यवधी तरुण आणि नवोदित गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित झाले. ‘अॅम्फी’च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात ‘एसआयपी’चा ओघ सातत्याने वाढत असला, तरी ‘एसआयपी’ बंद होण्याचे प्रमाणही फार आहे. जितया नव्या ‘एसआयपी’ सुरू होत आहेत, तितयाच किंवा त्यातून अधिक अगोदरच्या ‘एसआयपी’ बंदही केल्या जात आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या वर्तनाचा अभ्यास केला असता एक लक्षात येते की, केवळ कमी खर्चासाठी
‘डायरेट प्लॅन’ निवडणारे अनेक गुंतवणूकदार बाजारातील मानसिक दबावाला बळी पडतात. तर, ‘रेग्युलर प्लॅन’मधील गुंतवणूकदार तुलनेने अधिक काळ गुंतवणुकीत राहतात. ‘डायरेट प्लॅन’द्वारे स्वतः गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांपैकी, केवळ १२.४ टक्के गुंतवणूकदारच पाच वर्षांपेक्षा अधिक काळ गुंतवणूक सुरू ठेवतात. उर्वरित ८७.६ टक्के गुंतवणूकदार पाच वर्षांच्या आतच ‘एसआयपी’ बंद करतात.
याउलट, म्युच्युअल फंड वितरक किंवा मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागारांच्या माध्यमातून ‘रेग्युलर प्लॅन’मध्ये गुंतवणूक करणार्यांपैकी २१ टयांहून अधिक गुंतवणूकदार, पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सातत्याने गुंतवणूक करतात. ‘फिनटेक’ प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम आहेत. ‘फिनटेक’ अॅपवर दररोज नवे फंड, स्टार रेटिंग, टॉप गेनर व विविध शिफारशी दिसतात. त्यांमुळे अनेक गुंतवणूकदार वारंवार फंड बदलण्याच्या मोहात पडतात. परिणामी, दीर्घकालीन गुंतवणुकीतील सातत्य तुटते. बाजारातील घसरण किंवा वैयक्तिक आर्थिक अडचणींमुळे गुंतवणूकदार ‘एसआयपी’ बंद करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा वितरक त्याला परिस्थिती समजावून सांगतो आणि चुकीचा निर्णय टाळण्यास मदत करतो. अनेकदा हीच वेळेवर दिलेली साथ, भविष्यातील लाखो रुपयांच्या संपत्तीचे संरक्षण करते. तंत्रज्ञान हे गुंतवणुकीचे प्रभावी साधन आहे. मात्र आर्थिक प्रवास यशस्वी करण्यासाठी केवळ साधन पुरेसे नसते. योग्य वेळी योग्य दिशा दाखविणारा, बाजारातील अस्थिरतेत मानसिक आधार देणारा आणि दीर्घकालीन शिस्त कायम ठेवणारा अनुभवी मार्गदर्शक आवश्यक असतो. ‘डायरेट प्लॅन’मध्ये ०.५ ते एक टक्का खर्चाची बचत होते. पण या बचतीच्या नादात, गुंतवणूकदार पाच वर्षांच्या आतच ‘एसआयपी’ बंद करत असेल, तर चक्रवाढीचा सर्वांत मोठा फायदाच तो गमावतो. याउलट, ‘रेग्युलर प्लॅन’मध्ये वितरकाला काही प्रमाणात कमिशन दिले जात असले, तरी त्याच्या सततच्या मार्गदर्शनामुळे गुंतवणूक १५ ते २० वर्षे अखंड सुरू राहिली, तर अंतिम निधी ‘डायरेक्ट प्लॅन’मधील अपूर्ण गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असू शकतो.