गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणाची एनएचआरसीकडून दखल; आश्रमशाळेच्या वसतिगृहात सहा विद्यार्थिनींना सर्पदंश;

तिघींचा मृत्यू, तिघींवर उपचार सुरू; राज्य सरकारला दोन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश

    14-Aug-2026
Gadchiroli Snakebite Case
 
मुंबई : (Gadchiroli Snakebite Case) गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सहा आदिवासी विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन त्यापैकी तिघींचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सुओ मोटो दखल घेतली आहे. या घटनेप्रकरणी आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
समोर आलेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध नसल्याने त्या जमिनीवर झोपत होत्या. त्याचदरम्यान सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. यातील तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उर्वरित तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वृत्तातील तथ्ये खरी असल्यास विद्यार्थिनींच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो, असे एनएचआरसीने नमूद केले आहे. त्यामुळे आयोगाने या प्रकरणाची स्युओ मोटो दाखल करत महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे.(Gadchiroli Snakebite Case)
 
जखमी विद्यार्थिनींच्या प्रकृतीचा अहवालही मागविला
 
मुख्य सचिवांकडून मागविण्यात आलेल्या अहवालात घटनेची सविस्तर माहिती, संबंधित विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्यात आलेली वैद्यकीय मदत तसेच उपचार घेत असलेल्या तीन जखमी विद्यार्थिनींची सद्यस्थिती आणि आरोग्यविषयक माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल दोन आठवड्यांच्या आत सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.(Gadchiroli Snakebite Case)
 
एका खोलीत ७९ विद्यार्थिनी
 
दि. ११ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांच्या वृत्तानुसार, संबंधित वसतिगृहात एका खोलीत तब्बल ७९ विद्यार्थिनी राहतात. हे वसतिगृह गेल्या सुमारे २५ वर्षांपासून कार्यरत असून, तेथे मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.(Gadchiroli Snakebite Case)
 
गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाच्या घटनांची संख्या लक्षणीय असल्याचेही माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी वसतिगृहातील पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून सादर होणाऱ्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.(Gadchiroli Snakebite Case)
 
 




संबंधित मजकूर