आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश; ठाण्याच्या पाणीप्रश्नावर शिलार-पोशीरसोबतच इतर जलस्रोतांतील अतिरिक्त पाण्याची चाचपणी, काळू धरणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे निर्देश

    13-Aug-2026
Davkhare 
 
ठाणे : (Thane) ठाण्याच्या भविष्यातील पाणीप्रश्नासाठी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिलार आणि पोशीर प्रकल्पांतून ६०० एमएलडी पाणी मिळविण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. तसेच काळू धरणाचे प्रलंबित न्यायालयीन प्रकरण जलदगतीने निकाली काढण्यासाठी ते ‘फास्ट ट्रॅक’ करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेता शिलार व पोशीर प्रकल्पांमधून ठाणे महानगरपालिकेस एकूण ६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. (Thane)
 
बैठकीत ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. शिलार आणि पोशीर प्रकल्पांमधून प्रत्येकी ३०० एमएलडी, असे एकूण ६०० एमएलडी पाणी ठाणे महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी शासनाकडे केली आहे. (Thane)
 
बैठकीनंतर आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, “बैठक अतिशय सकारात्मक झाली. ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने योग्य पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शिलार-पोशीर प्रकल्पांसोबतच इतर कोणत्याही धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का, याची तपासणी करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.” (Thane)
 
तसेच काळू धरणाच्या प्रलंबित न्यायालयीन प्रकरणाबाबतही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टीने प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी दिली. (Thane)
 
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या सुमारे २९.८१ लाख लोकसंख्येला ५९० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. घोडबंदर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांमध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे केवळ सध्याची गरज भागविण्याऐवजी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी विविध जलस्रोतांचा एकत्रित विचार करून दीर्घकालीन जलनियोजन करण्याची आवश्यकता आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी बैठकीत मांडली. (Thane)
 
“ठाणेकरांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये, यासाठी उपलब्ध प्रत्येक संभाव्य जलस्रोताचा विचार करणे गरजेचे आहे. शिलार-पोशीरमधील ६०० एमएलडी पाण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतांमधून अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश मिळणे ही सकारात्मक बाब आहे. काळू धरणाच्या प्रकरणालाही गती मिळाल्यास भविष्यातील जलनियोजनाला मोठी मदत होईल,” असे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सांगितले. (Thane)
 
ठाणे शहराच्या भविष्यातील विकासासाठी पुरेसा, शाश्वत आणि नियोजित पाणीपुरवठा हा अत्यावश्यक घटक आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या पाणीप्रश्नावर शासनस्तरावर सकारात्मक निर्णय होईपर्यंत आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहील, असा विश्वास आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. (Thane)
 
 




संबंधित मजकूर