एसआयआर प्रक्रिया कुठवर आली? काय म्हणाले मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम?

    13-Aug-2026
SIR 2026 Maharashtra
 
मुंबई : (SIR 2026 Maharashtra) भारत निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेंतर्गत घरोघरी जाऊन गणना पत्रे भरून घेण्याची कार्यवाही १७ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे तसेच मतदारांच्या नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक महिन्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
 
विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुररिक्षण २०२६ संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची बुधवार दि.१२ रोजी मंत्रालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपसचिव अरविंद शेट्ये उपस्थित होते.
 
२४ ऑगस्ट नंतर मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ आणि पत्ता, मोबाईल क्रमांक, छायाचित्र आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसह सध्याच्या मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही या प्रक्रियेत अर्ज करता येणार आहे. (SIR 2026 Maharashtra)
 
अनकलेक्टेबल प्रकरणांची जिल्हानिहाय यादी संकेतस्थळावर
 
गणना प्रपत्र उपलब्ध न होऊ शकलेल्या मतदारांची ‘अनकलेक्टेबल’ यादी जिल्हानिहाय आणि मतदारसंघातील भागनिहाय प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये मृत्यू, स्थलांतर, दुबार नोंद, संबंधित मतदार उपलब्ध नसणे किंवा अन्य कारणांमुळे गणना प्रपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांचा समावेश आहे. ही यादी जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले. (SIR 2026 Maharashtra)
 
राजकीय पक्षांच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी (बीएलए) तसेच नागरिकांनी या याद्यांची पाहणी करावी. यादीत आपले किंवा परिचित पात्र मतदाराचे नाव चुकीने समाविष्ट झाले असल्यास त्याबाबत तातडीने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देता येणार आहे. या याद्या दररोज अद्ययावत केल्या जाणार असल्याने अंतिम मुदतीपूर्वी त्यांची नियमित पाहणी करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले. (SIR 2026 Maharashtra)
 
राज्यात ७७.७७ टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन
 
राज्यात आतापर्यंत सुमारे ७७.७७ टक्के मतदारांच्या गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. सुमारे १८.४६ टक्के जमा करता न येण्याजोगे (अनकलेक्टेबल) गणना प्रपत्रे आहेत, तर ३.७८ टक्के प्रकरणांची कार्यवाही अद्याप प्रक्रियेत आहे. गणना प्रपत्र प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतर त्याचे डिजिटायझेशन करण्यासाठी काही दिवस लागत असल्याने उर्वरित प्रक्रिया सुरू असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले. (SIR 2026 Maharashtra)
 
मुंबईत ६३ टक्के डिजिटायझेशन; ३० टक्के गणना प्रपत्रे अनकलेक्टेबल
 
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांचा विचार करता आतापर्यंत ६३ टक्के गणना प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. सुमारे ३० टक्के गणना पत्रे अनकलेक्टेबल असून सुमारे ७ टक्के प्रकरणांची प्रक्रिया सुरू आहे. महानगर क्षेत्रांमध्ये स्थलांतरित लोकसंख्येमुळे अशा प्रकरणांचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले. (SIR 2026 Maharashtra)
 
गणना पत्र भरण्यासाठी कागदपत्रे किंवा मॅपिंग अनिवार्य नाही
 
गणना पत्र भरून देण्यासाठी सध्या संबंधित नागरिक त्या ठिकाणी वास्तव्यास असणे महत्त्वाचे आहे. 2002 च्या मतदार यादीतील मॅपिंग किंवा जुळवणी झाली नसली अथवा आवश्यक कागदपत्रे सध्या उपलब्ध नसली तरी गणना पत्र भरून देण्यास नागरिकांनी टाळाटाळ करू नये. आवश्यक कागदपत्रे नंतर सादर करण्याची संधी उपलब्ध आहे.
 
गणना पत्रातील वैयक्तिक माहितीमध्ये नाव, मोबाईल क्रमांक, आई-वडिलांची नावे तसेच उपलब्ध असल्यास आधार क्रमांकाची माहिती भरावी आणि गणना पत्रावर स्वाक्षरी करावी. कुटुंबातील प्रौढ व्यक्तीलाही कुटुंबातील सदस्याच्या वतीने स्वाक्षरी करता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. (SIR 2026 Maharashtra)
 
दुबार नाव असल्यास एका ठिकाणची नोंद नाकारण्याचे आवाहन
 
एखाद्या मतदाराला एकापेक्षा अधिक ठिकाणी गणना पत्र प्राप्त झाले असल्यास एका ठिकाणची नोंद नाकारावी. एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असणे कायद्यानुसार कारवाईस पात्र ठरू शकते. (SIR 2026 Maharashtra)
 
नवमतदारांना २४ ऑगस्टनंतर अर्जाची संधी
 
२४ ऑगस्ट नंतर पात्र नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. १८ वर्षे पूर्ण झालेले तसेच अन्य जिल्ह्यातून किंवा राज्यातून स्थलांतरित झालेले आणि पात्र असूनही मतदार यादीत नाव नसलेले नागरिकही या संधीचा लाभ घेऊ शकतील. (SIR 2026 Maharashtra)
 
 




संबंधित मजकूर