ठाणे : (Dombivli Tiranga Rally) स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत यंदा भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने होणाऱ्या या रॅलीत सुमारे ३५ ते ३६ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा घेऊन हजारो नागरिक मार्गक्रमण करणार आहेत.
१५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता कॅ.विनय कुमार सच्चआन स्मारक परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीला सुरुवात होईल. लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे.(Dombivli Tiranga Rally)
या उपक्रमात ५० हून अधिक शाळांमधील सुमारे १५ हजार विद्यार्थी, माजी सैनिक, एनसीसी-एनएसएस कॅडेट्स, विविध सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण डोंबिवली तिरंगामय होणार आहे.
विशाल तिरंगा घेऊन चालण्याचा यापूर्वीचा विक्रम मोडून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. ‘एक तिरंगा, एक देश, एक अभिमान’ या भावनेतून होणारा हा उपक्रम डोंबिवलीच्या राष्ट्रप्रेमाचे भव्य दर्शन घडविणारा ठरणार आहे.(Dombivli Tiranga Rally)