वन्यजीवांप्रतिच्या आस्थेला कृतीची जोड देत बचावकार्य, छायाचित्रण आणि जनजागृती ते संवर्धनासाठी सातत्याने झटणार्या कोल्हापूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांच्याविषयी...
वन्यजीवांविषयीची आस्था अनेकांना असते. मात्र, त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे हात फारच कमी. जंगलात एखादा प्राणी अडचणीत सापडला की, त्यापर्यंत पोहोचण्यासाठी धाडसाबरोबरच त्याचे वर्तन समजून घेण्याचे भान, प्रसंगावधान, संयम आणि त्याच्याविषयीची आस्थाच सर्वाधिक महत्त्वाची असते. वन्यजीवांसोबत काम करणार्या अनेक व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात हा गुण दिसतोच. कोल्हापूर परिसरात वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार आणि सर्पमित्र म्हणून कार्यरत असलेले देवेंद्र भोसले हे त्यांपैकीच एक. वन्यजीवांच्या बचावकार्यापासून, जैवविविधतेच्या नोंदी आणि जनजागृतीपर्यंत त्यांचे काम केवळ प्रसंगनिष्ठ नाही, तर त्यातून संवर्धनाची व्यापक भूमिकाच आकारास आली.
देवेंद्र यांचा वन्यजीवांशी जवळचा संबंध ‘सर्पमित्र’ म्हणून सुरू झाला. मानवी वस्तीत शिरलेला साप दिसला की, त्याला सुरक्षितपणे योग्य अधिवासात सोडण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. यातून त्यांना सापांच्या विविध प्रजाती, त्यांचे वर्तन आणि मानव-सर्प संघर्षाचे स्वरूप ज्ञात झाले. मात्र, हे काम नेहमीच सुरक्षित असेलच असे नाही. रसेल वायपरसारख्या विषारी सापाचा बचाव करताना, त्यांना सर्पदंशही झाला. हा त्यांच्या वाटचालीतील अत्यंत धोकादायक क्षण होता. यामुळे वन्यजीवांपासून दूर जाण्याऐवजी, त्यांच्या अभ्यासाकडे देवेंद्र यांनी अधिक गांभीर्याने पाहिले.
सर्पमित्र म्हणून सुरू झालेली ही वाटचाल, पुढे विविध वन्यजीवांच्या बचावकार्यापर्यंत पोहोचली. विहिरीत पडलेल्या गव्याची सुटका, पुराच्या अडकलेल्या माकडांच्या कळपाला वाचवण्याचे काम किंवा वाहनाच्या धडकेत जखमी कोल्ह्याला मदतीचा प्रसंग, देवेंद्र यांनी अशा घटनांमध्ये सहभाग घेतला. यातील काही प्रसंग तर विशेष धाडसी. सुमारे ७० फूट उंचीवर अडकलेल्या घारीची, गिर्यारोहण तंत्राच्या मदतीने सुटका करण्यात आली. दुसरीकडे मगरीच्या अन्ननलिकेत अडकलेला मासेमारीचा लोखंडी गळ काढण्याचे कामही करण्यात आले. या घटनांमध्ये एका चुकीच्या हालचालीचा परिणाम, बचावकर्त्याबरोबरच वन्यप्राण्याच्या जीवावर होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रत्येक मोहिमेत देवेंद्र यांची कसोटीच लागली.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे वन्यजीव छायाचित्रण. त्यांच्यामते छायाचित्रण केवळ सौंदर्य टिपण्याचा छंद नसून, जैवविविधतेच्या दस्तऐवजीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. या छायाचित्रांमुळेच सामान्य नागरिकांना, परिसरातील वन्यजीवांविषयी कुतूहल निर्माण होते. एखाद्या दुर्लक्षित जीवाचे छायाचित्र लोकांसमोर आले की, त्यामागील अधिवास, अन्नसाखळी आणि पर्यावरणीय महत्त्वाबाबत चर्चा सुरू होते.
भोसलेंच्या कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या क्षेत्रीय निरीक्षणाला वैज्ञानिक नोंदीची मिळालेली जोड. कोल्हापूर परिसरातून ‘आयसोमॅट्रस’ वंशातील, नव्या विंचवाच्या प्रजातीच्या शोधाशी संबंधित वैज्ञानिक प्रकाशनात देवेंद्र यांचे नाव सहलेखक म्हणून नोंदवले गेले आहे. तसेच कोल्हापुरात आढळलेल्या तीन पट्टेरी खारींमधील ‘ल्युकिझम’ या दुर्मीळ रंगवैशिष्ट्याची नोंदही, त्यांच्या कामाशी संबंधित आहे. ही बाब महत्त्वाची आहे कारण, जंगलात फिरणार्या कार्यकर्त्यांकडे, अनेकदा वैज्ञानिक संशोधनासाठीची माहिती जमा होत असते. योग्य निरीक्षणे, छायाचित्रे आणि नोंदी, संशोधकांसाठी आधार ठरू शकतात. भोसले यांच्या कामातून क्षेत्रीय अनुभव आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरणातील दुवा दिसतो.
वन्यजीव वाचवणे हीच संवर्धनाची पहिली पायरी असली, तरी मानव आणि वन्यजीवांतील संघर्ष कमी करण्यासाठी, समाजाची मानसिकता बदलणेही तितकेच महत्त्वाचे. यासाठी भोसले ग्रामपंचायती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वन्यजीवांविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेतात. वन्यप्राण्यांविषयीची भीती आणि गैरसमज दूर करून, सहअस्तित्वाचा मार्ग स्वीकारण्याची गरज ते अधोरेखित करतात. विशेषतः कोल्हापूर परिसरातील मगरी आणि मानवातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, या जनजागृतीला मोठेच महत्त्व आहे. नदी, तलाव आणि जलाशय हे मगरींचे नैसर्गिक अधिवास. अशा भागांमध्ये माणसांची वर्दळ वाढली की, संघर्षाच्या घटना घडू शकतात. अशा वेळी प्रत्येक मगर पकडण्यापेक्षा, स्थानिकांना तिचे वर्तन समजावणे आणि सुरक्षित सहअस्तित्वाचे मार्ग विकसित करणे आवश्यक आहे.
वन्यजीवसंवर्धनाच्या क्षेत्रात प्रसिद्धीपेक्षा सातत्य महत्त्वाचे. संकटात सापडलेल्या प्राण्याची हाक ऐकून त्याच्यापर्यंत पोहोचणे, त्याला सुरक्षित करणे, त्याची नोंद करणे आणि त्या अनुभवातून समाजाला काही शिकवणे, हीच देवेंद्र यांच्या प्रवासाची खरी ओळख आहे. या प्रवासात त्यांना माजी वन अधिकारी सुनील लिमये, आशुतोष सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन आणि विनायक आळेकर या मित्रांचीही साथ लाभली. त्यांचा कॅमेरा निसर्गाचे सौंदर्य टिपतो, तर वन्यजीव बचावासाठी पुढे होणारे हात निसर्गाशी त्यांची बांधिलकी सिद्ध करतात. म्हणूनच, देवेंद्र यांची कहाणी छायाचित्रकार किंवा सर्पमित्र असण्याबरोबरच; वन्यजीवांबरोबरचे मैत्र जपत त्यांच्या अस्तित्वासाठी प्रयत्नरत असलेल्या एका संवेदनशील क्षेत्रीय कार्यकर्त्याचीही आहे. त्यांच्या पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!