सिंधुुदुर्गात सापडले दुर्मीळ ऑर्किड; महाराष्ट्रातील पहिलीच नोंद

सावंतवाडीच्या जंगलात आढळली लिपेरिस डिफ्लेक्सा

    12-Aug-2026   
Liparis deflexa orchid


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दुर्मिळ ऑर्किड प्रजातीची महाराष्ट्रातील पहिली अधिकृत नोंद झाली आहे (Liparis deflexa orchid). लिपेरिस डिफ्लेक्सा म्हणजेच बेंट लिपेरिस या जमिनीवर वाढणाऱ्या ऑर्किडची नोंद सावंतवाडी तालुक्यातील नेमळे, एरंडवाकवाडी परिसरातील जंगलात करण्यात आली आहे (Liparis deflexa orchid). या प्रजातीची महाराष्ट्रात यापूर्वी अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याने ही नोंद राज्याच्या वनस्पती वैविध्याच्या अभ्यासातील महत्त्वाची भर मानली जात आहे. (Liparis deflexa orchid)लिपेरिस डिफ्लेक्सा ही भारतात पूर्वीच ज्ञात असलेली प्रजाती आहे.
 
 
भारतातील ११ राज्यांमधून या प्रजातीची नोंद आहे. मात्र, महाराष्ट्रातील नोंदीमुळे या प्रजातीच्या भारतीय वितरणाच्या यादीत आणखी एका राज्याची भर पडली आहे. ही नोंद धनंजय राऊळ यांनी केली असून ट्राॅपिकल प्लांट रिसर्च या नियतकालिकामध्ये ही नोंद प्रसिद्ध झाली आहे. नोंदीनुसार, उत्तर पश्चिम घाटातील वनस्पतींच्या अन्वेषणादरम्यान सप्टेंबर २०१२ मध्ये सावंतवाडी तालुक्यात लिपेरिस वंशातील ही वनस्पती आढळली. त्यानंतर तिचे सखोल वर्गीकरणात्मक परीक्षण करण्यात आले. उपलब्ध वैज्ञानिक साहित्याचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रात लिपेरिस डिफ्लेक्साची यापूर्वी नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट झाले.सिंधुदुर्गात ही वनस्पती अत्यंत मोठ्या परिसरात पसरलेली आढळलेली नाही.
 
 
संशोधनानुसार, या प्रजातीने व्यापलेले क्षेत्रफळ सुमारे १०० चौरस मीटर आहे. संपूर्ण वितरणाच्या दृष्टीने प्रजातीचा दर्जा ‘दुर्मिळ’ असा नमूद करण्यात आला असला, तरी या विशिष्ट ठिकाणी ती ‘स्थानिक पातळीवर विपुल’ असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्गासारख्या जैवविविधतेने समृद्ध जिल्ह्यातील जंगलांचे सूक्ष्म पातळीवर सर्वेक्षण केल्यास आणखी दुर्मिळ किंवा पूर्वी नोंद न झालेल्या वनस्पती समोर येण्याची शक्यता आहे.
 
 
ऑर्किडचे वैशिष्ट्य
ऑर्किडची ही प्रजात अनेक परिचित ऑर्किडप्रमाणे झाडांवर वाढणारी परजीवी किंवा अधिवासी वनस्पती नसून जमिनीवर वाढणारी लहान आकाराची वनस्पती आहे. तिच्या खोडाच्या तळाशी कांद्यासारखी रचना असते. दोन पाने जमिनीवर पसरलेली असतात. तिचा फुलोरा तुलनेने उंच असून ३५ ते ५७ सेंटीमीटरपर्यंत वाढतो. या वनस्पतीची फुले आकाराने लहान असून फिकट हिरव्या रंगाची असतात. पाकळ्या मागे वळलेल्या असतात, तर ओठासारखा भाग हिरवट-पिवळा आणि पंख्यासारखा दिसतो. ऑगस्ट-सप्टेंबर हा तिचा फुलण्याचा कालावधी असून सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फळधारणा होते. पावसाळ्याच्या उत्तरार्धात ही वनस्पती बहुतांशी आढळते.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर