ठाणे : (Ashok Bagve Lecture On Dnyaneshwari) ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळेच्या सभागृहात ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांच्या ‘माउलींचे पसायदान’ या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य भारती ठाणे च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात निकीता भागवत यांच्या स्वागत गीताने झाली, तर संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रवींद्र कारेकर यांनी केले.
प्रास्ताविक करताना अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भावपूर्ण स्मरण केले. "१९६६ सालापासून सुरू झालेली साहित्य भारती ही अखिल भारतीय स्तरावर सर्व भाषिक लेखकांना एकत्र घेऊन कार्य करणारी संस्था आहे. नवी पिढी घडवणे हा आमचा मुख्य हेतू असून, 'अक्षर यज्ञ' या उपक्रमाद्वारे ठाण्याची साहित्यिक ओळख अधिक घट्ट व्हावी आणि दर्जेदार श्रोतृवर्ग निर्माण व्हावा," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी साहित्य भारती ठाणे चे नवनियुक्त अध्यक्ष कवी सतीश सोळांकुरकर यांचा त्यांनी सत्कार केला.(Ashok Bagve Lecture On Dnyaneshwari)
पसायदानाच्या निरूपणात कवी अशोक बागवे यांनी ज्ञानेश्वरांच्या अलौकिक प्रतिभेचा पट उलगडला. "माउली ही संपूर्ण जगाची काळजी घेणारी माउली आहे," असे सांगत त्यांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती, भगवद्गीतेवरील भाष्य, यावर प्रकाश टाकला. एकनाथ महाराज नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरीच उपलब्ध झाली नसती असेही त्यांनी प्रतिपादन केले.(Ashok Bagve Lecture On Dnyaneshwari)
‘ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या’ ज्यांच्याकडून वेदांच प्रतिपादन झालं, स्वसंवेज्ञ आत्मरुपाने जो स्वतःचं सेवन करतो, स्वतःच स्वतःचा आस्वाद घेतो, असं जे आत्मरूप आहे ते ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. संत मुक्ताबाईच्या ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सुर्याशी’ या मुक्ताबाईच्या अभंगाचे निरूपण करताना ते म्हणाले, तुमच्या मनात आलं तर तुम्ही सुध्दा अशक्य असलेली गोष्ट कराल. म्हणून अभिजात मराठी भाषा सगळ्या राजकारण्यांकडून म्हणून घेतली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.(Ashok Bagve Lecture On Dnyaneshwari)
दुरीताचे तिमीर जावो म्हणजे जे अनिष्ट आहे, जे वाईट आहे, जे अयोग्य आहे, जे पाप आहे, त्या दुरीताचे तिमीर जावो असे ते म्हणाले. पसायदानाचे शेवट करताना त्यांनी संत नामदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे वर्णन करताना रचलेल्या अभंगाने शेवट केला.(Ashok Bagve Lecture On Dnyaneshwari)
"नामा म्हणे आता लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥"
अशा प्रकारे, त्यांनी प्रत्येक वाक्याला पसायदानातल्या ओळींचा संदर्भ देत कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेला.
पसायदानाच्या निरूपणात कवी प्रा. अशोक बागवे यांनी ज्ञानेश्वरांच्या अलौकिक प्रतिभेचा पट उलगडला. अत्यंत रसाळ भाषेत निरूपण करत त्यांनी पसायदानाचा खरा अर्थ श्रोत्यांपर्यंत पोहोचवला. कार्यक्रमाची सांगता जनार्दन म्हात्रे यांनी मानलेल्या आभाराने आणि सामूहिक पसायदानाने झाली. या सोहळ्याला पंचांगकर्ते दा. कृ. सोमण, कवी विजय जोशी, अनघा प्रकाशनचे मुरलीधर नाले व अमोल नाले, कवी रामदास खरे, कवी कांताराम सोनावणे, कवी प्रकाश पोळ यांच्यासह अनेक रसिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Ashok Bagve Lecture On Dnyaneshwari)