अशासकीय अनुदानित महाविद्यालयांसाठी ‘ई-ऑफिस प्रणाली’ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण!

    12-Aug-2026   

E-Office System for Colleges

मुंबई (E-Office System for Colleges) :
उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यक्षेत्रातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक, सुरक्षित आणि कागदरहित करण्याच्या उद्देशाने ‘ई-ऑफिस प्रणाली’ सुरु करण्यात आली असून या प्रणालीचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, "या प्रणालीमुळे राज्यातील १ हजार २३१ अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज डिजिटल माध्यमातून अधिक सुलभ आणि कार्यक्षम होणार आहे. या महाविद्यालयांमधून संबंधित विभागीय कार्यालये आणि मंत्रालयाशी मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार व प्रशासकीय कामकाज केले जाते. पारंपरिक पद्धतीमध्ये कागदपत्रांचे स्कॅनिंग, टपालाद्वारे पत्रव्यवहार, कागदपत्रांची हाताळणी आणि फाईलच्या पाठपुराव्यासाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ व खर्च यामुळे प्रशासकीय प्रक्रियेला विलंब होतो. ई-ऑफिस प्रणालीमुळे या अडचणी दूर होऊन कामकाजाला डिजिटल गती मिळणार आहे." (E-Office System for Colleges)

प्रमुख उद्देश काय?

ई-ऑफिस प्रणालीमुळे महाविद्यालये, विभागीय सहसंचालक कार्यालये, उच्च शिक्षण संचालनालय तसेच मंत्रालयातील उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यातील पत्रव्यवहार आणि प्रशासकीय प्रक्रिया डिजिटल माध्यमातून सुलभ होणार आहेत. शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून कामकाज गतिमान करणे, दस्तऐवज व माहिती सुरक्षित ठेवणे आणि निर्णय प्रक्रिया अधिक जलद व परिणामकारक करणे हा या प्रणालीमागील प्रमुख उद्देश आहे. (E-Office System for Colleges)

प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्र ई-ऑफिस

या उपक्रमांतर्गत प्रत्येक महाविद्यालयासाठी स्वतंत्र ई-ऑफिस उपलब्ध करून देण्यात आले असून ते संबंधित महाविद्यालयाच्या नावाने कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाचे ई-ऑफिस ‘सेवार्थ आयडी’शी संलग्न करण्यात आले आहे. त्यामुळे ई-फाईल, ई-टपाल, पत्रव्यवहार, प्रस्ताव, अहवाल आणि परिपत्रक यांचे व्यवस्थापन अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने करता येणार आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल गव्हर्नन्स अधिक गतिमान, पारदर्शक, उत्तरदायी आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (E-Office System for Colleges)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर