सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ चा जयघोष; राहुल नार्वेकरांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

    12-Aug-2026   

CSMT Train Announcements

मुंबई (CSMT Train Announcements) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'जय भवानी, जय शिवाजी' अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत पत्र दिले. (CSMT Train Announcements)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे केवळ देशातील महत्त्वाचे ऐतिहासिक रेल्वे स्थानक नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रभक्तीच्या विचारांचे प्रतीक आहे. या स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले असून, देशभरातून दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रवासाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि पराक्रमाचा संदेश देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने ही उद्घोषणा महत्त्वपूर्ण ठरेल, असे राहुल नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे. (CSMT Train Announcements)

सीएसएमटी येथून सुटणाऱ्या तसेच या स्थानकावर येणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीच्या उद्घोषणांमध्ये नियमित रेल्वे माहितीबरोबरच 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'जय भवानी, जय शिवाजी' या घोषणा समाविष्ट करण्यात याव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व समाजघटकांना सोबत घेतले. त्यांचे प्रशासन, शौर्य, लोककल्याणकारी धोरणे आणि राष्ट्रहिताची भूमिका आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी अशा उपक्रमांना महत्त्व आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. (CSMT Train Announcements)

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित रेल्वे प्रशासनाला आवश्यक सूचना द्याव्यात आणि सीएसएमटी येथून येणाऱ्या व निघणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत या उद्घोषणा करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. (CSMT Train Announcements)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर