मुंबई: (Food and Drug Administration) नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध, दुग्धजन्य पदार्थ भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी अर्थात 'मकोका' अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे मंगळवारी उपमुख्यमंत्र्यांसमोर विकसित महाराष्ट्र २०४७ अंतर्गत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सादरीकरण केले. त्यावेळी शिंदे यांनी ही सूचना केली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याआधीच भेसळखोरांवर कारवाईचा दणका सुरू केला असताना, आता उपमुख्यमंत्री शिंदेंनीही कठोर कारवाईला पाठिंबा दिला आहे.(Food and Drug Administration)
अन्नात भेसळ करणे हा केवळ साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. लहान मुले मोठ्या प्रमाणावर दूध पितात, बनावट पनीर आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे कर्करोग सारख्या दुर्धर आजाराला तोंड द्यावे लागू शकते. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारची नरमाई न दाखवता 'मकोका' अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावा, असे त्यांनी सांगितले.(Food and Drug Administration)
या भेसळखोरांवर कारवाई करताना त्यांचेवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, जेणेकरून त्यांना कायदेशीर पळवाटा मिळणार नाहीत, असेही ते म्हणाले. भेसळखोरांविरोधात न्यायालयात खटला चालवताना कोणतीही कायदेशीर त्रुटी करता कामा नये. त्यासाठी नामवंत, ज्येष्ठ विधीतज्ज्ञांचा समावेश असलेली विशेष लीगल टीम तयार करावी, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.(Food and Drug Administration)
बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, विधी व न्याय विभागाचे सचिव उदय शुक्ला, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Food and Drug Administration)