बीडी कामगारांना दिलासा; थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू

    11-Aug-2026   

Beedi Workers Minimum Wage
 
मुंबई : (Beedi Worker Minimum Pay) किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बीडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बीडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या पुढाकारामुळे बीडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याचे आणि फरकाची तसेच थकबाकीची वसुली प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. (Beedi Worker Minimum Pay)
 
बिडी कामगारांच्या प्रलंबित वेतनाबाबत विविध कामगार संघटना आणि मालक संघटनांकडून आलेल्या निवेदनांची दखल घेत मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी बैठका पार पडल्या. त्यांनी दोन्ही संघटनांचे म्हणणे सविस्तर ऐकून दि. २ जून २०२६ रोजी झालेल्या अंतिम बैठकीत दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींना सविस्तर निवेदने सादर करण्याचे निर्देश दिले होते. भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय स्तरावरील सचिव अनिल डुमणे यांनी निवेदन देऊन पुढाकार घेतला. (Beedi Worker Minimum Pay)
 
बीडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराच्या पुनर्निर्धारणाबाबत विधि व न्याय विभागाचे अभिप्राय मागवण्यात आले. या अभिप्रायानुसार, १० नोव्हेंबर २०१४ रोजीच्या अधिसूचनेद्वारे घोषित केलेले किमान वेतनाचे दर सद्यस्थितीत लागू असून त्याच्या अंमलबजावणीवर कोणतीही कायदेशीर स्थगिती नाही. त्यामुळे सदर वेतनाची अंमलबजावणी करण्यात कोणताही कायदेशीर अडथळा उरलेला नसून सक्षम प्राधिकरणांनी या दरांची कठोर अंमलबजावणी करावी व देय थकबाकी, फरकासाठी वसुलीची कार्यवाही सुरू करावी, असा अभिप्राय देण्यात आला.(Beedi Worker Minimum Pay)
 
दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रान्वये कामगार आयुक्तांना १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीतील महागाई भत्त्यासह सुधारित वेतनाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन निश्चितीनुसार बीडी कामगारांना सर्व महानगर पालिका हद्द असलेल्या परिमंडळ-१ मध्ये मूळ वेतन २१० रुपये आणि महागाई भत्ता १६९ रुपये मिळून एकूण ३७९ रुपये प्रतिदिन वेतन देय राहील. (Beedi Worker Minimum Pay)
 
तर सर्व महानगरपालिका हद्द वगळून उर्वरित इतर कार्यक्षेत्र असलेल्या परिमंडळ-२ मध्ये मूळ वेतन १९२ रुपये आणि महागाई भत्ता १६९ रुपये मिळून एकूण ३६१ रुपये प्रतिदिन वेतन १००० बिड्या वळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शासनाने थकबाकी व फरकाची वसुली प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिल्यामुळे राज्यातील हजारो बिडी कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Beedi Worker Minimum Pay)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर