नाशिक, (Nashik Earthquake) : नाशिक शहरासर जिल्ह्याला शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी १० वाजून एक मिनिटानी ४.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३३ वाजता ३.३ तीव्रतेचा आणखी एक धक्का बसला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार मुख्य भूकंपाची खोली सुमारे पाच किलोमीटर इतकी होती. (Nashik Earthquake)
भूकंपाचा केंद्रबिंदू महाराष्ट्र-गुजरात सीमेच्या जवळ हतगड पर्वतरांग परिसरातील भणवड भागातील असून नाशिक शहरासह सुरगाणा, कळवण, देवळा, चांदवड, पेठ, दिंडोरी आणि निफाडच्या काही भागांत भूकंपाचे हादरे जाणवले. अनेक ठिकाणी नागरिक घाबरून घराबाहेर पडले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Nashik Earthquake)
नाशिकच्या पश्चिम भागांत जुलै महिन्यापासून लहान व मध्यम तीव्रतेच्या भूकंपांची मालिका सुरू आहे. जुलैच्या २५ ते २८ दरम्यान सुरगाणा, कळवण, दिंडोरी आणि पेठ परिसरात काही तासांत अनेक धक्के नोंदवले गेले होते. या परिसरातील भूगर्भीय फॉल्ट रचना आणि पावसाळ्यात जमिनीत मुरणार्या पाण्यामुळे भूगर्भातील दाबात होणारे बदल हे या हालचालींमागील संभाव्य घटक असू शकतात, असे प्रशासनाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. (Nashik Earthquake)