‘ज्ञान भारतम्’ अभियानातून ज्ञानाचे डिजिटायझेशन

    10-Aug-2026



मुंबई, दि. १० : प्रतिनिधी
हजारो वर्षांपासून जतन होत आलेल्या हस्तलिखितांमध्ये भारताच्या ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा दडलेला आहे. आयुर्वेद, गणित, खगोलशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील हे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘ज्ञान भारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. घर, मंदिर, मठ किंवा वैयक्तिक संग्रहात जपून ठेवलेल्या जुन्या हस्तलिखितांची नोंदणी, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून हा ज्ञानवारसा भविष्यासाठी सुरक्षित केला जाणार आहे.

अनेक कुटुंबांकडे आजही अनेक दशकांपूर्वीची हस्तलिखिते जतन करून ठेवलेली आहेत. त्यामध्ये विविध विषयांवरील मौल्यवान माहिती आणि ज्ञान दडलेले असण्याची शक्यता आहे. अशा हस्तलिखितांची अभियानांतर्गत नोंद करून त्यांचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हस्तलिखिताच्या मूळ मालकाचा मालकी हक्क कायम राहणार असून, डिजिटायझेशनचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे.

भारताचा इतिहास केवळ राजे, युद्ध किंवा राजवटींमध्ये नाही. तो आपल्या साहित्यामध्ये, विज्ञानामध्ये, आयुर्वेदामध्ये, गणितामध्ये, तत्त्वज्ञानामध्ये आणि या सर्व ज्ञानाची नोंद करून ठेवणाऱ्या हस्तलिखितांमध्येही आहे. याच ज्ञानवारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्यासाठी ‘ज्ञान भारतम्’ राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. ७५ वर्षांपूर्वीची हाताने लिहिलेली हस्तलिखिते आज एखाद्या कुटुंबाच्या संग्रहात शांतपणे जपली असतील. त्यामध्ये आयुर्वेद, तत्त्वज्ञान, गणित, खगोलशास्त्र, साहित्य किंवा इतर विषयांवरील ज्ञान असू शकते. ही माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची नोंद करणे आणि डिजिटायझेशन करणे महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या ज्ञान आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनाला महत्त्व दिले जात आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाला महत्त्व दिले जात आहे.

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

तुमच्या घरात, मंदिरात, मठात, ग्रंथालयात किंवा वैयक्तिक संग्रहात ७५ वर्षांपूर्वीची हस्तलिखिते असतील, तर त्यांची माहिती ‘ज्ञान भारतम्’ अभियानात नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी www.gyanbharatam.com या संकेतस्थळाला भेट देता येणार असून, ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल ॲपद्वारेही माहिती नोंदविता येणार आहे.





संबंधित मजकूर