भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन


मुंबई: (Tiranga Yatra) “आता भारताला कोणीही थांबवू शकत नाही. भारताला रोखण्याची ताकद कोणातही नाही. जात-पात, धर्म आणि छोट्या-छोट्या वादांमध्ये न अडकता देशासाठी एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज आहे. तिरंग्याची आन, बान आणि शान यासाठी एकत्र जगू आणि एकत्र मरू,” असा जोशपूर्ण संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुंबईत आयोजित तिरंगा यात्रेत ते बोलत होते. (Tiranga Yatra)

देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी सी-फेस प्रोमोनॉइड येथे सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा यात्रेत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते. याचसोबत मोठ्या संख्येने नागरिक, युवा आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना संबोधित केले. (Tiranga Yatra)

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “आज मला दोन सागर दिसत आहेत. एक समोर हिंद महासागर आणि दुसरीकडे तिरंग्याचा महासागर. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारकांनी फाशी स्वीकारली, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करले आणि तमाम भारतीयांनी संघर्ष केला, तो तिरंगा १५ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री फडकला. आता जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत हा तिरंगा खाली येणार नाही.” (Tiranga Yatra)

‘भारत जगातील चौथी आर्थिक महासत्ता’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. “आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत जे कोणाला जमले नाही, ते भारताने करून दाखवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्याही देशाला आपले यान उतरवता आले नव्हते, ते काम भारताच्या वैज्ञानिकांनी करून दाखवले,” असे ते म्हणाले. (Tiranga Yatra)

अंतराळ, स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “इमर्जिंग टेक्नॉलॉजीजमध्ये जगाशी मुकाबला करणारा भारत आपल्याला पाहायला मिळतोय. जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणून गेल्या सात-आठ वर्षांत भारत जगासमोर उभा राहिला आहे. जगात सर्वाधिक युवा असलेला देश म्हणूनही भारताची शक्ती प्रचंड आहे.” (Tiranga Yatra)

‘भारताची घोडदौड थांबवण्याचे प्रयत्न सुरू’

भारताची प्रगती रोखण्यासाठी काही परकीय शक्ती प्रयत्न करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. “भारत असाच पुढे जात राहिला तर एक दिवस जगातील सर्वात मोठी महासत्ता भारत होईल, अशी काहींना भीती आहे. त्यामुळे भारताच्या अंतर्गत मामल्यांमध्ये लुडबूड करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. मात्र, तिरंगा घेऊन बाहेर पडलेल्या या तरुणाईला थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही. भारताला थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही,” असा इशारा त्यांनी दिला. (Tiranga Yatra)

‘2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू’

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेल्या विकसित भारताच्या संकल्पनेचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “आता केवळ दोन दशके बाकी आहेत. २०४७ मध्ये हा भारत जगातील विकसित देश म्हणून जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये अडकून चालणार नाही. जात-पात, धर्माचे भेद आणि वेगवेगळ्या वादांमध्ये अडकून चालणार नाही. आपल्याला एकच दृष्टिकोन आणि एकच मंत्र घ्यावा लागेल. आम्ही एक साथ चलू, आम्ही एकत्रित चलू, कदम से कदम मिलाकर चलेंगे, तिरंगा हातात घेऊन चलेंगे. तिरंग्याच्या आन, बान आणि शानसाठी एकत्र जगू आणि एकत्र मरू. जर आपण या विचाराने पुढे गेलो, तर भारताला कोणीही रोखू शकत नाही,” असे फडणवीस यांनी सांगितले. (Tiranga Yatra)

‘तिरंगा हातातच नव्हे, मनातही असला पाहिजे’

“आज आपण तिरंगा यात्रा काढत असलो तरी तिरंगा आपल्या मनामध्ये आहे. तिरंग्याचा सन्मान आपल्या मनामध्ये आहे. भारताचे संविधान आपल्या मनामध्ये आहे आणि भारताचा स्वाभिमानही आपल्या मनामध्ये आहे. नवभारताची संकल्पना मोदीजींनी मांडली आहे. हा नवभारत तयार करण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच तिरंगा हातात घेण्याला खऱ्या अर्थाने अर्थ आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Tiranga Yatra)

‘आताची क्रांती विकसित भारतासाठी’

९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या तिरंगा यात्रेचा संदर्भ देत फडणवीस यांनी स्वातंत्र्यलढ्यातील ‘भारत छोडो’ आंदोलनाशी आजच्या अभियानाची तुलना केली. “१९४२ ची क्रांती ‘करो या मरो’ची आणि ‘भारत छोडो’ची होती. आताची क्रांती ‘करो या मरो’ची आहे; पण ती विकसित भारत तयार करण्यासाठी आहे. आताची क्रांती भारतविरोधी शक्तींना ‘भारत छोडो’ म्हणण्याची आहे. आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी ही क्रांती आपल्याला एकत्रितपणे करायची आहे,” असे त्यांनी सांगितले. “उद्याचा भारत मजबूत आणि स्वाभिमानी भारत आपण घडवून दाखवू. या स्वाभिमानी भारतामध्ये जसा तिरंगा सर्वांत वर राहील, तसा शिवरायांचा महाराष्ट्रही पहिल्या रांगेत दिसेल,” असा विश्वास व्यक्त करत फडणवीस यांनी भाषणाचा समारोप केला. (Tiranga Yatra)




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर