मुंबई : (Maharashtra Ambulance Policy) राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी राज्य सरकार लवकरच सर्वसमावेशक 'महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण' जाहीर करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या धोरणामुळे रुग्णवाहिकांच्या दरात पारदर्शकता, निश्चित प्रतिसाद वेळ, डिजिटल देखरेख आणि आपत्कालीन सेवांचे एकत्रीकरण साधले जाणार आहे.
सरनाईक म्हणाले की, रुग्णवाहिका ही केवळ वाहतुकीचे साधन नसून जीव वाचविणारी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांची नोंदणी, उपलब्धता, सेवा, प्रतिसाद वेळ, दरनिश्चिती आणि रुग्णालयापर्यंतचा संपूर्ण प्रवास अधिक शिस्तबद्ध करण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. सध्या राज्यात MEMS-108 प्रकल्पांतर्गत सुमारे १,०७६ रुग्णवाहिका कार्यरत असून खासगी रुग्णालये, धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या मिळून सुमारे ४,५०० ते ५,००० रुग्णवाहिका सेवा देत आहेत.(Maharashtra Ambulance Policy)
नव्या धोरणाअंतर्गत नागरिक, रुग्णवाहिका चालक, रुग्णवाहिकेतील टॅबलेट आणि आरटीओ-आरोग्य विभागासाठी स्वतंत्र अशा चार डिजिटल प्रणाली विकसित केल्या जाणार आहेत. यामुळे नागरिकांना जवळील उपलब्ध रुग्णवाहिका, तिचे अचूक स्थान, पोहोचण्याचा अंदाजित वेळ, व्हिडिओ कॉलद्वारे प्राथमिक वैद्यकीय मार्गदर्शन तसेच अंदाजित भाड्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.(Maharashtra Ambulance Policy)
चालकांच्या ॲपमध्ये कॉल स्वीकारणे किंवा नाकारणे, कर्तव्याची नोंद, प्रशिक्षणाची माहिती आणि मार्गदर्शनाच्या सुविधा असतील. रुग्णवाहिकेतील टॅबलेटवर रुग्णाची प्राथमिक माहिती, उपचारांची नोंद, रुग्णालयाशी व्हिडिओ संपर्क तसेच AED, ऑक्सिजन आणि सक्शन यांसारख्या उपकरणांची तपासणी नोंदवली जाईल. आरटीओ आणि आरोग्य विभागाच्या डॅशबोर्डवर प्रत्येक रुग्णवाहिकेचे स्थान, प्रतिसाद वेळ, चालकांची कामगिरी आणि नियमभंगाची माहिती उपलब्ध राहणार आहे.(Maharashtra Ambulance Policy)
धोरणातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे दरनिश्चितीतील पारदर्शकता. प्रत्येक नोंदणीकृत रुग्णवाहिकेस ॲपवर दरपत्रक जाहीर करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव असून AIS-125 मानकांनुसार कमाल दर निश्चित केले जाणार आहेत. प्रत्येक प्रवासाची डिजिटल नोंद आणि ई-पावती उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक रोखण्यास मदत होईल.(Maharashtra Ambulance Policy)
याशिवाय अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी सर्वसामान्य नागरिकांना CPR, रक्तस्राव थांबविणे, भाजल्यावरील प्राथमिक उपचार यांसारख्या प्रथमोपचारांचे सचित्र मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. "आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. त्यामुळे तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांचा समन्वय साधून राज्यातील प्रत्येक नागरिकाला विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे हेच या धोरणाचे उद्दिष्ट आहे," असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Ambulance Policy)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.