डोंबिवली : (ST Concession) कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या प्रयत्नातून डोंबिवली एमआयडीसी येथील एसटी डेपोमध्ये एसटी महामंडळाच्या अधिकृत नोंदणी केंद्रामार्फत 65 वर्षांवरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचा शुभारंभ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी सुमारे 100 ज्येष्ठ पुरुष नागरिकांनी शासनाने निश्चित केलेले 199 रु. शुल्क भरून एनसीएमसी स्मार्ट कार्डचा लाभ घेतला. (ST Concession)
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 65 वर्षे पूर्ण झालेल्या पुरुष ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या बस प्रवासात 50 टक्के भाडे सवलत मिळण्यासाठी हे स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. याशिवाय, राज्यातील सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत तसेच 75 वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 100 टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. हे विशेष नोंदणी शिबिर 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत एसटी डेपो, जिमखाना रोड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे सुरू राहणार आहे. तसेच 3 ऑगस्ट 2026 पासून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत दररोज दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत एनसीएमसी स्मार्ट कार्ड देण्याची सशुल्क सेवा नियमितपणे उपलब्ध राहणार आहे. (ST Concession)
स्मार्ट कार्ड काढण्यासाठी संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, ओटीपी प्राप्त होण्यासाठी स्वतःचा मोबाईल फोन सोबत आणणे आवश्यक असून, ज्यांचे कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीची प्रत्यक्ष स्वतःच्या दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थिती अनिवार्य आहे.
स्मार्ट कार्डासाठी शासनाने निश्चित केलेले ₹199 शुल्क आकारले जाईल. हरवलेले किंवा खराब झालेले स्मार्ट कार्डही नियमानुसार शुल्क भरून बदलून मिळणार आहे. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने 65 वर्षांवरील सर्व पात्र पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही यावेळी आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. (ST Concession)